आरोग्य तपासणी ते थेट घरपोच औषधं, कोरोनाविरोधात लढणाऱ्या साताऱ्यातील 'या' टीमचं सर्वत्र होतंय कौतुक

आरोग्य तपासणी ते थेट घरपोच औषधं, कोरोनाविरोधात लढणाऱ्या साताऱ्यातील 'या' टीमचं सर्वत्र होतंय कौतुक

समीर रवींद्र शिंदे मित्र परिवाराची टीम कोरोना संकटाच्या काळात इतरांना आदर्श घालून देण्यासारखे काम करत आहेत.

  • Share this:

सातारा, 18 ऑगस्ट : कोरोना संसर्गाचे (Coronavirus) जागतिक संकट आता दारात येऊन थांबलं आहे. त्याला परतवून लावायचं असेल तर त्याच्याशी शक्तीने नव्हे तर कृतीने हरवायचे आहे. जेवढ्या अधिक चाचण्या तेवढी यावर लवकर मात हे या आजाराचे सूत्र आहे. म्हणून आज जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढविल्यामुळे बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. यात सर्वात महत्वाचे जे व्याधिग्रस्त लोक आहेत, त्यांना शोधून त्यांच्यावर योग्य ते उपचार वेळीच करणे, त्यांची दक्षता घेणे हे यात खूप महत्त्वाचे आहे. एखाद्या वयस्कर किंवा व्याधिग्रस्त व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली तर ती चिंतेची बाब होते. म्हणून जिल्हा प्रशासन घरोघरी जाऊन व्याधीग्रस्त आणि वयस्कर मंडळी यांचा सर्व्हे करत आहे. हे देशात, राज्यात अनेक संस्था प्रशासनाबरोबर पुढे येऊन काम करीत आहेत. या संस्था आपापल्या परीने मदत करीत आहेत.

अशीच एक खंडाळा तालुक्यातील समीर रवींद्र शिंदे मित्र परिवाराची टीम कोरोना संकटाच्या काळात इतरांना आदर्श घालून देण्यासारखे काम करीत आहेत. खंडाळा तालुका हा पुण्याजवळचा तालुका. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या असल्यामुळे पुणे येथून ये-जा करणारे अनेक कर्मचारी आहेत. आज खंडाळा तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळत असले तरी कोपर्डे हे खंडाळा तालुक्यातील गाव याला अपवाद आहे. काही प्रमाणात समीर रवींद्र शिंदे मित्र परिवाराला या कामाचे श्रेय जाते. हा शिंदे परिवार करत असलेल्या कामामुळे कापेर्डे गाव व आसपासच्या परिसरातील गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी व कोणाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अहोरात्र काम करीत आहे. त्यांनी त्यांच्या कामाचा इतरांना एक आदर्श घालून दिला आहे.

या परिवारामध्ये समीर शिंदे यांनी हा उपक्रम सुरु केला. या परिवाराचे तेच प्रमुख असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शुभम शिंदे, निलेश बोडरे, विक्रम साळुंखे, अजित बोडरे, अविनाश शिंदे, विशाल बोडरे, रोहित शिंदे, प्रमोद शिंदे यांच्यासह आशा वर्कर यांच्या मार्गदर्शनाखली काम करीत आहेत. या परिवाराला खंडाळ्याचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.

कोरोना संकटाच्या काळात आपण काही तरी समाजाचे देणे लागतो म्हणून हा परिवार गेल्या 2 महिन्यांपासून अहोरात्र काम करीत आहे. या परिवारातील सदस्य रोज गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करते. कुणाला ताप, जुलाब, उलटी, बी.पी. शुगर यांच्यासह कोणतेही छोटे- मोठे आजार आहेत याची खात्री करुन त्यांना शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधे यांच्याकडून घरपोच केली जात आहेत. जी औषधे शासकीय रुग्णालयात उपलब्ध नाहीत ती औषधे बाहेरच्या मेडिकलमधून आणायला सांगितले जाते.

कापेर्डे गावातील बऱ्यापैकी नागरिकांना बी.पी. आणि शुगरचा त्रास तसेच अंगदुखी थंडी ताप असे किरकोळ आजार असल्याचे घरोघरी सर्व्हेक्षणातून या परिवाराच्या लक्षात आले. खंडाळा तालुक्यातील बऱ्याच ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला आहे, परंतु समीर रवींद्र शिंदे मित्र परिवाराच्या केलेल्या कामामुळे आजतर कोपर्डे गावात एकही कोरोनाचा रुग्ण नाही, हे या परिवाराचे यश म्हणावे लागेल.

या परिवारावाकडून नुसतची आरोग्य तपासणीच केली जात नाही तर नागरिकांना कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायचा यासाठी सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर, स्वच्छतेचेही महत्त्व पटवून दिले जाते आहे.

समीर रवींद्र शिंदे मित्र परिवाराच्या कामाचे जिल्हा प्रशासनानेही दखल घेतली असून त्यांच्या कामाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कौतुक केले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध संस्थांनी जिल्हा प्रशासनाबरोबर कोरोना संकटावर मात करण्यासाठी काम केले तर आपला जिल्हा लवकरच कोरोना मुक्त होऊ शकतो यासाठी सामाजिक संस्थांबरोबर डॉक्टर यांनीही सामाजिक दायित्व म्हणून पुढाकार घेतला पाहिजे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 18, 2020, 4:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading