सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! ठाकरेंच्या राज्यात येणार पाच दिवसांचा आठवडा
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! ठाकरेंच्या राज्यात येणार पाच दिवसांचा आठवडा
केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही पाच दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे. यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
मुंबई, 04 फेब्रुवारी : केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही पाच दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे. यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करण्यासह राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दिले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याही मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. सह्याद्री अतिथीगृहावर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक आदी अधिकारी उपस्थित होते.
पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी सरकार विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 45 मिनिटे वाढवून, अत्यावश्यक सेवा वगळून तसेच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशन देण्यात आले असून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं.
VIDEO आपली मुंबई अशी शानदार दिसणार? BMC ने शेअर केला कोस्टल रोडचा फर्स्ट लुक
राज्यात रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
या मागण्या मान्य
मंत्रालयात महिलांसाठी विश्रामकक्ष, महिला अधिकाऱ्यांसाठी चक्राकार पद्धतीने होणाऱ्या बदल्यांबाबत धोरण ठरविणे, विश्रामगृहांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी आरक्षण ठेवणे या मागण्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. ज्या मागण्यांवर तातडीने निर्णय होणे शक्य आहे त्या प्रलंबित ठेवू नका अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.