मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोना व्हायरसची धास्ती, सिंधुदुर्गात दाखल झालेल्या 'त्या' जहाजाबद्दल मोठा खुलासा!

कोरोना व्हायरसची धास्ती, सिंधुदुर्गात दाखल झालेल्या 'त्या' जहाजाबद्दल मोठा खुलासा!

या जहाजावरच्या एकूण 22 कर्मचाऱ्यांपैकी 10 कर्मचारी चीनचे आहेत.

या जहाजावरच्या एकूण 22 कर्मचाऱ्यांपैकी 10 कर्मचारी चीनचे आहेत.

या जहाजावरच्या एकूण 22 कर्मचाऱ्यांपैकी 10 कर्मचारी चीनचे आहेत.

 सिंधुदुर्ग, 07 फेब्रुवारी :   कोरोना व्हायरसच्या भीतीने सध्या भारतातही सर्वत्र धास्तीचं वातावरण असतानाच सिंधुदुर्गातल्या रेडी बंदरात चिनी जहाज दाखल झाल्याच्या बातमीने संपूर्ण कोकणात खळबळ उडाली. पण न्यूज 18 लोकमतने या जहाजासंबंधी सर्व कागदपत्र तपासली असता हे जहाज सिंगापूरचं असल्याचं स्पष्ट झालंय. आणि या जहाजावरच्या एकूण 22 कर्मचाऱ्यांपैकी 10 कर्मचारी चीनचे आहेत. रेडी बंदरात येण्याआधीच या सर्व कर्मचाऱ्यांची 28 जानेवारीला मुंबई बंदरात आरोग्य तपासणी झाली असल्याचंही न्यूज 18 लोकमतच्या पाहणीत उघड झालंय. तरीही सतर्कता म्हणून कस्टम्स विभाग आणि रेडी पोर्टच्या अधिकाऱ्यानी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून  या सर्व कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा आरोग्य तपासणी करुन घेतली आहे. या तपासणीत एकाही कर्मचाऱ्यात  कोरोना संबंधीची लक्षणे आढळून आलेली नसल्याचं आरोग्य यंत्रणेला आढळलं आहे.

काय आहे वस्तुस्थिती ? 

गेल्या दहा वर्षांपासून सिंधुदुर्ग च्या कळणे आणि रेडी मायनिंगमधून काढण्यात आलेलं लोहखनिज रेडी बंदरातून चीनला निर्यात केलं जातं. यासाठी वेळोवेळी अनेक कंपन्यांची जहाजे रेडी बंदरात येत असतात. 4 फेब्रुवारीच्या मध्यरात्री सिंधुदुर्गच्या रेडी बंदरात लोहखनिज वाहुन नेण्यासाठी ' नाथन ब्रॅंडन नावाचं जहाज दाखल झालं. हे जहाज खरं तर सिंगापूरचं आहे. पण ते चीनचं असल्याची बातमी रेडी गावात पसरली. कस्टम्स विभागाने या जहाजावरच्या कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासली असता त्यात दहा कर्मचारी चीनचे असल्याचं स्पष्ट झालं. कोरोना व्हायरसची असलेली धास्ती आणि त्यासंबंधी घ्यावयाची काळजी लक्षात घेता कस्टम्स विभागाने रेडी पोर्टच्या अधिकाऱ्याना या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचं सांगितलं. त्यानुसार 6 फेब्रुवारीला रेडी पोर्टच्या व्यवस्थापनाने एका खाजगी डॉक्टरला बोटीवर पाठवून ही तपासणी करुन घेतली. न्यूज 18 लोकमतने या खाजगी डॉक्टरशी संपर्क साधला असता डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये कोरोनासंबंधी कोणतीही लक्षणे एकाही कर्मचाऱ्यात दिसून आली नाहीत. तरीही सिंधुदुर्गच्या कस्टम्स विभागाने रेडीमधल्या स्थानिक लोकप्रतिनिधीना बोलवून लोकाना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं .त्यामुळे या जहाजाबध्दलची धास्ती आणखीनच वाढली.

रेडी बंदरापर्यंत कसा झालाय या जहाजाचा प्रवास 

न्यूज 18 लोकमतने या जहाजासंबंधी केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीनुसार, हे जहाज 21 ऑक्टोबर 2019 ला भारताच्या कोचीन बंदरात आलं. 4 नोव्हेंबर 2019 ला ते मॉरिशस मध्ये दाखल झालं. 15 नोव्हेंबर 2019 ला ते साउथ आफ्रिकेला गेलं. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2019 ला ते पुन्हा भारतात आलं. त्यानंतर 1 जानेवारी 2020 ला ते इंडोनेशियाला गेलं. तिथून ते 17 जानेवारी 2020 ला पुन्हा सिंगापूरला आलं. त्यावेळी चीन चे दहा कर्मचारी या जहाजावर नव्याने दाखल झाले. त्यानंतर हे जहाज 28 जानेवारी 2020 ला मुंबई बंदरात आलं. त्यावेळी त्यावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर 1 फेबृवारीला हे जहाज निघून 4 फेबृवारीला रेडी बंदरात आलं. जहाजाच्या या संपूर्ण चार महिन्याच्या प्रवासात ते एकदाही चीनला गेलं नाही. पण 17 जानेवारीला या जहाजावर चीनचे कर्मचारी दाखल झाल्यामुळे या जहाजाबाबत अधिक सतर्कता बाळगण्यात आली. आता या जहाजावरच्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण  झाली असून येत्या आठ दिवसात सुमारे 55 हजारटन लोहखनिज घेउन हे जहाज चीन ला रवाना होणार आहे. मात्र प्रश्न हाच आहे की जर या जहाजावरच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आठवडाभरापूर्वीच  मुंबईत झालेली असताना सिंधुदुर्गच्या कस्टम्स विभागाने पुन्हा ती करण्याचा घाट का घातला?

First published:
top videos