तुम्ही घेतलेलं सॅनिटायजर बनावट तर नाही ना? नागपूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार

तुम्ही घेतलेलं सॅनिटायजर बनावट तर नाही ना? नागपूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार

कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. खबरदारी म्हणून मास्क आणि सॅनिटायजर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे.

  • Share this:

नागपूर,  15 मार्च : कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. खबरदारी म्हणून मास्क आणि सॅनिटायजर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. मात्र, बनावट सॅनिटायजर तयार करून ते विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भामट्यांना नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. विक्की खानचंदानी आणि जितेंद्र मुलानी असं जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सॅनिटायजर च्या मागणीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. या मागणीचा फायदा घेत अनेकांनी याचा काळाबाजार करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी विक्की खानचंदानी याने एमआयडीसी परिसरातील अनेक मेडिकल स्टोर्समध्ये जाऊन सॅनिटायजर विकण्याचा प्रयत्न केला.

15 आणि 50 मिलिलिटरच्या सॅनिटायजर बॉटल विकण्याचा प्रयत्न करीत असताना एका जागरूक मेडिकल स्टोर संचालकाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी विक्कीला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून सॅनिटायजर च्या 65 बॉटल जप्त केल्या. हे सॅनिटायजर भेसळयुक्त असून त्याला आग लावल्यास बराच वेळ जळत राहते, या भेसळ युक्त सॅनिटायजर मध्ये मोठ्या प्रमाणात स्पिरिट, रसायन,कापूर आणि पाण्याचा वापर केल्याने हे सॅनिटायजर घातक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हे सर्व भेसळयुक्त सॅनिटायजर विक्कीने जितेंद्र मुलानीकडून आणल्याचं सांगितलं. ज्यानंतर जितेंद्र मुलानीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. बनावट सॅनिटायजर बनवण्यासाठी लागणार कच्चा माल छत्तीसगड आणि  मध्य प्रदेशातून येत असल्याची माहिती आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

कोरोनाची अफवा पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

कोरोनाची अफवा पसरवली आणि कॉलेजची बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात स्वेरी कॉलेजचे प्रा. मुकुंद मारुती पवार यांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

पंढरपुरातील विविध व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरुन ' महाराष्ट्रात आणखी एक आढळला कोरोना रुग्ण' स्वेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता विद्यार्थी; संस्थेने फेटाळला सुट्टीचा अर्ज' अशा आशयाचा मजकूर एका वृत्तवाहिनीच्या लोगोचा वापर करुन खोटी बातमी तयार केली.

स्वेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकाने ती बातमी पाहिली. त्यानंतर त्या पालकाने कॉलेजमधील प्राध्यापकांना फोन करुन संबंधीत बातमीबाबत चौकशी केली. परंतु, असा कोणताही प्रकार घडला नव्हता. त्यामुळे प्राध्यापकांनी घाबरू नका, असा प्रकार घडला नाही, असं सांगितलं.

या बातमीद्वारे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. तसंच श्री विठ्ठल एज्युकेशन अँ‍ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची बदनामी केली म्हणून प्राध्यापक मुकुंद पवार यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

First published: March 15, 2020, 6:43 PM IST

ताज्या बातम्या