असिफ मुरसळ, (प्रतिनिधी)
सांगली, 16 मे- ही बातमी तुमच्या-आमच्या जिव्हाळ्याची आहे. तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असतील तर त्या जरा घडी घालून बघा...आम्ही असं तुम्हाला का सांगतोय.. हे जाणून घ्या, समजून घ्या, अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. सांगली जिल्ह्यातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. विटा येथे पाचशेच्या नोटांचे तुकडे पडू लागले आहेत. या प्रकाराने विटयात खळबळ उडाली आहे. वाळलेले झाडाचे पान ज्याप्रमाणे हाताने चुरगळता, मोडता येते, त्याप्रमाणे पाचशेच्या नोटा घड्या घालताच तुटून पडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नोटबंदी नंतर रिझर्व्ह बँकेनं चलनात आणलेल्या पाचशे रुपयांच्या नव्या कोऱ्या नोटा आहेत. मात्र झाडाच्या वाळलेल्या पानाप्रमाणे एका क्षणात नोटांचे तुकडे पडताहेत.विटा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी ही बाब उघडकीस आणली आहे. घराशेजारी राहणाऱ्या एका वृद्धेनं या नोटा राठोड यांच्याकडं ठेवल्या होत्या. अवघ्या दीड महिन्यांत त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.
राठोड यांनी ही बाब विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणली. व्यवस्थापक दळवी यांना सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी प्रात्यक्षिक दाखविले आहे. राठोड यांनी जवळपास ५०० रुपयांच्या १४ नोटांच्या बाबत हा प्रकार घडला असून याबाबतची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. पाचशेच्या नव्या नोटांचे तुकडे पडत असल्यामुळं विटा परिसरात चांगलीच खळबळ उडालीय.
अनिल राठोड यांनी सांगितले की, यांच्या शेजारी एक वृद्ध महिला राहते. ती रोजंदारीवर मोलमजुरी करते. तिला दीड महिन्यापूर्वी सात हजार रुपये मिळाले होते. ते तिने पाकिटात घालून कपाटात ठेवले होते. काल त्यातील साडेतीन हजार रुपये बाहेर काढून रुमालात बांधून मिरच्या आणण्यासाठी बाजारात ती गेली. त्यानंतर रुमाल उघडून पैसे द्यायचे म्हणून पाचशेची एक नोट काढताच तिचा तुकडा पडत असल्याचे आढळून आले. नंतर तिने दुसरी नोट काढली असता घडी उघडताच त्या नोटेचाही तुकडा पडला. घाबरुन त्या महिलेने सर्व नोटा घडी करून पाहिले असता त्या नोटांचे तशाच प्रकारे तुकडे पडत असल्याचे दिसले.
500 च्या नोटांचे का पडताय तुकडे, काय आहे सत्य?