मुंबई, 22 जून : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंड केलंय, यामध्ये काही अपक्ष आमदारही आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वेगवान राजकीय घडामोडी आता कोणत्या वळणावर पोहचणार याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागले आहे. आत्तापर्यंत घडलेल्या घडामोडींवरून पुढील 3 तासात 3 मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता (Maharashtra politics) आहे.
राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना नेमकं राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे प्रभारी राज्यपाल नवीन मुख्यमंत्र्यांना पाचारण करतील. बहुमत सिद्ध करायला सांगितलं जाऊ शकतं. प्रभारी राज्यपालांच्या देखरेखेखाली या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सभागृहाचे विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते. विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्यासंबधी अनेक घडामोडी होऊ शकतात. अधिवेशनात सरकार बनवण्याच्या तांत्रिक घडामोडी तपासून पाहिल्या जातील, बहुमत सिद्ध होत असेल तर महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागेल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
हे वाचा -
EXCLUSIVE : 'शिवसेना पुन्हा संघर्षाने उभी करु', आमदारांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्र्यांचा एल्गार
तिसरे म्हणजे बहुमत गेल्याने साहजिकच कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. महत्त्वाचे म्हणजे आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर त्यांच्या नावासमोरून मंत्रिपदाचा उल्लेख काढून टाकला आहे. आदित्य ठाकरेंचा कृती सूचक आहे. यावरून ठाकरे सरकार राजीनामा देण्याच्या तयारी असल्याचे दिसत आहे.
हे वाचा -
शिवसेना आमदार उडाले भुर्रर्र...; आता गुवाहाटी ठरणार महाराष्ट्राच्या सत्ताबदलाचा पट
महत्त्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे गटाला सभागृहात दोन तृतांश संख्याबळ सिद्ध करता आलं तर राज्यपाल हे शिंदेंच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देऊ शकतात. तर उद्धव ठाकरे समर्थक आमदार हे एक वेगळा गट बनून राहू शकतात, ख्यातनाम घटनातज्न उल्हास बापट यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.