किशोर गोमाशे, प्रतिनिधी
वाशिम, 25 डिसेंबर : स्त्रियांकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्या मोठ्या भावाला लहान भावाने आयुष्यातून कायमचं संपवल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी लहान भावासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
जिल्ह्याच्या आसेगाव पेनच्या पैनगंगा नदीमध्ये पुलाखाली 6 डिसेंबर रोजी मोटारसायकल ला बांधलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणाची अतिशय निर्दयीपणे खून करून मृतदेह नदी पात्रात फेकून दिला. मृतक धोडप गावातील संदीप बकाल हा असल्याचं तपासात उघड झालं.
संदीप बकाल हा 27 नोव्हेंबरपासून घरून बेपत्ता होता. तो त्या दिवशी रिठदला आला होता. मात्र, संध्याकाळी त्याचा मोबाईल बंद येत असल्यानं तशी तक्रार रिसोड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.
संदीप बकाल या 28 वर्षीय तरुणाच्या खुनाचं कारण आणि आरोपी शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असताना पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. पवनकुमार बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी ठाकरे आणि रिसोड पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या पथकाने बारकाईने तपास केला असता धक्कादायक वास्तव समोर आलं.
संदीपचा खून त्याच्याच लहान भावाने मावस भाऊ आणि इतर दोघांच्या साहाय्यानं केल्याचं निष्पन्न झालं. संदीप बकाल याच्याकडे कायम मोठी रक्कम असायची तसंच तो नेहमी कोणत्याही स्त्रीवर वाईट नजर ठेवत असे. त्याला त्यामध्ये नातं ही समजत नसल्यानं त्रस्त झालेल्या त्याच्या सख्ख्या लहान भावानेच आयुष्यातून संपवलं.
संदीपचा चौघांनी गळा आवळून खून केला आणि मृतदेह मोटारसायकलला बांधून नदी पात्रात फेकून दिला.
संदीप बकाल हा स्त्रियांवर वाईट नजर ठेवून राहत असल्याने आणि त्याची वर्तवणूक अशोभनीय असल्यानेच त्याला त्याच्या लहान भावाने यमसदनी पाठविल्याची घटना घडली आहे. या खुनाचा सखोल तपास पोलीस करत असून या खून प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे.
एकाच कुटुंबातील मोठा भाऊ जीवानिशी गेला असून दुसरा भाऊ मोठ्या भावाच्या खून प्रकरणी जेलमध्ये गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.