पालघर, 14 ऑक्टोबर : लॉकडाउनच्या काळात पालघर जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त भागात अंगणवाड्या, ग्राम बाल विकास केंद्रे,आरोग्य व्यवस्था आदींवर प्रशासनाने भर न दिल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कुपोषण फोफावले आहे. पालघरमध्ये मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यात गेल्या वर्षी पेक्षा यंदा सुमारे 100 पेक्षा जास्त अतितीव्र (SAM) तर एक हजारांहून अधिक तीव्र कुपोषित बालके (MAM) वाढल्याची माहिती समोर येत आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असलेल्या वावर वांगणी गावात कुपोषणाने शेकडो बालमृत्यू झाले. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करीत होता. त्यावेळी तत्कालीन ठाणे व आताचा पालघर जिल्हा कुपोषणासाठी महाराष्ट्रात कुप्रसिद्ध झाला होता. त्यानंतर शासन प्रशासन कामाला लागले. बालमृत्यू रोखण्यात प्रशासनाला यश येत असले तरी कुपोषित बालकांची संख्या वाढतच आहे. कुपोषित बालकांच्या संख्येत होत असलेली वाढ ही चिंतेत भर घालणारी आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यात 1376 अतितीव्र कुपोषित बालकांची नोंद आहे तर 12684 तीव्र कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. या उलट याच कालावधीत यंदा या आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसून येते.
हैदराबादमध्ये हाहाकार! भिंत पडून 8 जणांचा मृत्यू,रस्त्यावरून वाहून गेल्या गाड्या
या वर्षी 1493 अतितीव्र तर 14013 तीव्र कुपोषित बालकांची नोंद झाली. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अतितीव्र कुपोषित बालकांमध्ये तब्बल 117 बालके तर तीव्र कुपोषित बालकांमध्ये 1329 एवढ्या संख्येने वाढ झाली आहे. याचाच अर्थ लॉकडाउनमध्ये कुपोषण निर्मूलनासाठी विविध स्तरावर प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने कुपोषण वाढले आहे. एकीकडे, कोरोना व दुसरीकडे कुपोषित बालकांची संख्या वाढत असताना प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
दरवर्षी, पावसाळ्या दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषण फोफावत आहे, हे वाढत्या आकडेवारीतून दिसते. जिल्ह्यात आजही जव्हार भागातील कुपोषण कमी होण्याचे नाव घेत नाही. पूर्वीसारखे कुपोषण कायम आहे. गेल्यावर्षी मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यात सर्वाधिक कुपोषित बालकांची नोंद जव्हार तालुक्यातील असून येथे 401अतितीव्र बालकांची नोंद झाली होती. विक्रमगडमध्ये 345 व डहाणूत 219 बालकांची नोंद होती. यंदा मार्च ते ऑगस्ट याच काळात जव्हार, डहाणूत कुपोषण मोठ्या संख्येने वाढले आहे. जव्हार तालुक्यात 524 बालकांची तर डहाणूत 317 बालकांची नोंद झाली आहे. विक्रमगडमध्ये 244 बालके अतितीव्र असल्याची नोंद झाली. तलासरी व पालघर तालुक्यात कुपोषण अल्प आहे.
तारीख ठरली! भाजपला धक्का देत अनेक नेत्यांसह खडसेंची लवकरच राष्ट्रवादीत एंट्री?
गेल्या वर्षी पेक्षा यंदा जव्हारमध्ये 123 कुपोषित बालके वाढली असून डहाणूत 102 बालके वाढल्याची नोंद झाली. वाढत असलेली ही कुपोषित बालके चिंतेचा विषय आहे. विक्रमगड तालुक्यात गेल्या वर्षीच्या संख्येपेक्षा 101 बालके कमी झाल्याची नोंद आहे. सकस,पोषक आहाराच्या कमतरतेमुळे हे कुपोषण वाढले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या लॉकडाउन काळात अंगणवाड्या बंद होत्या. तसंच ग्राम बाल विकास केंद्रेही बंद होती. शासनाचा निधी पुरेसा नव्हता याचा विपरीत परिणाम बालकांच्या आरोग्यावर झाल्याने ते कुपोषणाच्या खाईत लोटले गेले. परिणामी कुपोषित बालकांची संख्या आणखीन वाढत गेली. कोरोना काळात जिल्हा प्रशासन कुपोषण निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत, असे तत्कालीन जिल्हाधिकारी कैलास शिंदे वारंवार त्यावेळी सांगत होते.
उत्तर पुण्यात मुसळधार पाऊस, 5 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट
प्रशासनाच्या प्रयत्नाने कुपोषण निर्मूलन होत आहे असे प्रशासन भासवत असले तरी याच काळात कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली ही खरी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या काळात कुपोषण रोखण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. हेच या वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मार्च ते ऑगस्ट (6 महिने) अतितीव्र कुपोषित बालके (sam)
तालुके 2019 2020
डहाणू 319 317
तलासरी 17 8
मोखाडा 130 163
जव्हार 401 524
वि. गड 345 244
वाडा 178 152
पालघर 29 10
वसई 57 75
एकूण 1376 1493
मार्च ते ऑगस्ट (6महिने) तीव्र कुपोषित बालके (mam)
तालुके 2019 2020
डहाणू 1140 2336
तलासरी 1047 1096
मोखाडा 879 928
जव्हार 4132 4176
वि. गड 2565 2719
वाडा 2086 1834
पालघर 344 158
वसई 491 766
एकूण 12684 14013