नालासोपारा, 25 जून : कोरोनामुळे संपूर्ण जग हादरून गेलं आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतेचं वातावरण आहे. कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीनंतरही कोरोनाला हरवण्यात यश आलेलं नाही. अशातच दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत चालला असतानाच नालासोपाऱ्यातून एक विदारत चित्र समोर आलं आहे.
नालासोपाऱ्यात राहणाऱ्या एका इसमाचा मृत्यू रविवारी झाला. मात्र जगाचा निरोप घेतल्यानंतरही त्या व्यक्तीची परवड थांबली नाही. रुग्णवाहिकेची कोरोना महामारीत सुरू असलेली लूट आणि कुटुंबीयांकडे पैशाची असलेली कमतरता, याचा विचार करून थेट एका टॅक्सीच्या टपावर तिरडी बांधून त्यावर मृतदेह ठेवत स्मशानभूमीत आणून सदर व्यक्तीवर अत्यंसंस्कार करण्यात आले.
ही काळीज पिळवटून टाकणारी घटना नालासोपारा पूर्व येथे घडली आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील इतर व्यक्तींनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला, मात्र अव्वाच्या सव्वा पैसे मागितले असल्याने नकार दिला. एकीकडे कोसळलेला दुःखाचा डोंगर आणि त्यात अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्यात येणारी अडचण समोर होती. मग काय कुटुंबियांनी तुळींज येथील स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी चक्क एका टॅक्सीचा आधार घेतला.
टॅक्सीच्या वर तिरडी बांधण्यात आली व पूर्वेकडील तुळींज ,टाकीरोड मार्गावरून स्मशानभूमीत नेण्यात आले. कोरोना महामारीमुळे रोजगार, व्यवसायावर झालेले परिणाम , पैशाची चणचण आणि त्यात काही रुग्णवाहिकेकडून लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.