प्रवीण तांडेकर, प्रतिनिधी
भंडारा, 11 फेब्रुवारी : पोलीस असल्याचं सांगून एका नराधमाने अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात घडली. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस स्टेशनचा कर्मचारी असल्याचं समोर आलं आहे. निलेश हेडाऊ असं त्याचं नाव आहे.
भंडारा शहरात राहणारी पीडित मुलगी ही लाखनी इथं एका कॉलेजमध्ये 12 व्या वर्गात शिकत आहे. 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता कॉलेज आटोपून राष्ट्रीय महामार्ग 6 गडेगाव इथं रस्त्यावर मैत्रीणीसोबत उभी होती. त्यावेळी तिच्या मैत्रिणीचे मामा आल्याने त्यांच्या गाडीवर बसून दोघी जणी निघाल्याने ती एकटी उभी होती.
तेवढ्यात तिच्यासमोर एक कार येऊन थांबली आणि 'भंडारा रोडला कसं जायचं' अशी माहिती विचारली. पीडितेनं पत्ता सांगितल्यानंतर आपण स्वत: पोलीस असून तुला ही भंडारा सोडून देतो, अशी बतावनी करत गाडीमध्ये बसण्याचं सांगितलं.
पोलिस असल्यानं कोणताही संशय न आल्याने पीड़ित मुलगी कारमध्ये बसली. मात्र, काही अंतर पुढे गेल्यावर आरोपीने तिची छेड काढण्यास सुरुवात केल्याने पीडिताने प्रतिकार सुरू केला. अखेर तिने हिंमत करून गाडीचे स्टेरिंग फिरवल्याने गाडी आदळून थांबली. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने तिला फेकून पसार झाला.
त्यानंतर पीडिने लाखनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी 6 पथके तयार करून आरोपीची शोध घेतला. अखेर पोलिसांना तांत्रिक तपासात सुगावा लागत अवघ्या 72 तासांत आरोपी निलेश हेडाऊ याला अटक केली. आरोपी स्वत: पोलीस निघाल्याने पोलीस दलालाही हादरा बसला. या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.