सागर कुलकर्णी, प्रतिनिधी
पुणे, 11 डिसेंबर : राजस्थान, छत्तीसगडमध्ये पराभव होईल अशी शक्यता होतीच पण मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि शिवराज सिंह चौहान असताना अपेक्षित निकाल लागला नाही हे विचार करण्यासारखे आहे असं म्हणत भाजपचे खासदार संजय काकडे यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला. तसंच मंदिर, मस्जिद आणि नामकारणांचा मुद्दा सोडून द्यावा अशी टीकाही काकडेंनी केली.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगाणा विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. पाच पैकी 3 राज्यातून भाजपला हार पत्कारावी लागली आहे. भाजपच्या या पराभव पुण्याचे भाजपचे खासदार संजय काकडे यांनी पक्षावरच टीका केली. राजस्थानमध्ये आम्हाला धक्का बसेल याची शक्यता होती. पण मध्य प्रदेशमध्ये आमचे दोन मोठे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असताना अपेक्षित निकाल येत नसेल तर नक्कीच विचार करणे गरजेचं आहे असं काकडे म्हणाले.
या तिन्ही राज्यांमध्ये जवळपास 65 खासदार भाजपचे आहे. काँग्रेसचे फक्त 3 खासदार आहे. असं असताना आमच्या हातातून सत्ता जात असेल तर नक्की ही धोक्याची घंटा आहे अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचा विकासाचा नारा परत द्यावा लागणार आहे. भाजपने आतापर्यंत ज्या विकासाच्या मुद्दा उचलून धरला होता तो पुन्हा आणावा लागणार आहे. भाजपने जे जातीपातीचं राजकारण केलं आहे, मंदिर,मस्जिदी, नामकरण, पुतळे हे मुद्दे सोडून द्यावे लागणार आहे. विकासावर बोललं पाहिजे तरच फरक जाणवणार आहे असा सल्लाही त्यांनी दिला.
तसंच मी एक खासदार म्हणून बोलत नाही तर एक नागरीक म्हणून बोलतोय असंही काकडेंनी सांगितलं.
============================