13 मार्च : देशातला सर्वाधिक उंचीवर असलेला राष्ट्रध्वज बेळगाव शहरात फडकवण्यात आला आहे. किल्ला तलावाच्या काठावर हा झेंडा फडकल्यामुळे आता बेळगाव शहराच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा लावला गेला आहे.
110 मीटर उंचीवर असलेल्या या ध्वजाला केवळ पाच मिनिटात मशीनच्या सहाय्याने वर उचलण्यात आलं. त्यानंतर मराठा लाईट इंफंट्री रेजिमेंटल केंद्राच्या बँडने ध्वजाला मानवंदना दिली. भारत पाकिस्तानच्या अटारी सीमेवरील ध्वज आणि बेळगावच्या ध्वजाची उंची एकच आहे. त्यामुळं हा ध्वज देशातील सर्वात उंच फडकणारा ध्वज ठरला आहे.
देशवासियांना अभिमान वाटावा असा हा क्षण बेळगावकरांनी अनुभवला. या ध्वजास स्मारक ध्वज म्हणजेच मोनुंमेंटल फ्लॅग असं संबोधण्यात येणार आहे. या ध्वजाचे कापड पॉलिस्टर फॅब्रिक असून हवामानासाठी वेधरप्रूफही बनवण्यात आलं आहे.
स्मारकीय ध्वज हे अधिकाधिक उंचीवर असतात. आणि या ध्वजासाठी केंद्रीय गृह मंत्र्यालयाकडून खास परवानगीही मिळवण्यात आली.