मुंबई, 5 फेब्रुवारी : महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतनिधीचा पहिला हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण या मदतनिधीसाठी 1450 कोटींचा पहिला हप्ता तातडीने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी दिले आहेत.
दुष्काळग्रस्त भागात नुकसान भरपाईसाठी मदतनिधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात तातडीने जमा करावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत.
मदतनिधीचा पहिला हप्ता सर्व विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना आणि तेथून संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांना हा निधी देण्यात येईल. त्यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या थेट खात्यात हा निधी वितरित केला जाईल.
यासाठी बहुतांश जिल्ह्यांमध्ये गावनिहाय याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून काही जिल्ह्यांनी याद्या पूर्ण झालेल्या गावांमध्ये निधीदेखील वितरित केला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
VIDEO : उपोषणासह अण्णांना संपवण्याचा सरकारचा डाव - संजय राऊत