कोल्हापूर, 17 जानेवारी : कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात काही दिवसांपूर्वी गर्भलिंग निदान चाचणीचं प्रकरण समोर आलं होतं. पण याच पन्हाळा तालुक्यातल्या चावरे गावात एक आगळावेगळा कार्यक्रम पार पडला आहे.
चिमुकल्या तीर्थाचे स्वागत तिच्या वडील आणि आजोबांनी चक्क हत्तीवरून केलं आहे. दीपक महाडिक आणि दीपिका महाडिक या दांपत्याला कन्यारत्न प्राप्त झालं. दीपिका या बाळंतपणानंतर माहेरी होत्या, पण ज्यावेळी त्या चिमुकल्या तीर्थासोबत आपल्या सासरी म्हणजे चावरे गावी परतल्या त्यावेळी त्यांचं स्वागत जंगी करण्यात आलं आहे.
चक्क या तीर्थाची गावातून हत्तीच्या अंबारीतून मिरवणूक काढण्यात आली. यासोबतच गावातील शाळकरी मुलांनी पर्यावरण वाचवा असा संदेश देत तीर्थाच्या स्वागता बद्दल भव्य अशी रॅलीही काढली. आजही मुलगी नको ही मानसिकता समाजात पाहायला मिळते. पण तीर्थाचं हे स्वागत म्हणजे नक्कीच समाजातील एक वेगळेपण म्हणावे लागेल.
हेही वाचा - मुंबईतून GOOD NEWS, प्रवाशांना मध्य रेल्वेची नवीन वर्षाची भेट
दरम्यान, ढोल-ताशे, मिरवणूक, हत्ती हे सगळं पाहून चिमुकली तीर्थाही भारावून गेली होती. तिला नेमकं समजत नव्हतं की काय चाललं आहे. पण महाडिक कुटुंबीयांनी घरी आलेल्या चिमुकल्या तीर्थाचं अनोखा स्वागत केल्यामुळे सध्या त्यांचं कौतुक होतं आहे.