अंगावर पेट्रोल टाकून व्यावसायिकाला जिवंत पेटवले, जखमी अवस्थेत पोहोचला ठाण्यात

अंगावर पेट्रोल टाकून व्यावसायिकाला जिवंत पेटवले, जखमी अवस्थेत पोहोचला ठाण्यात

भूखंडाच्या व्यवहारातून एका व्यावसायिकांच्या कार्यालयात घुसून तीन जणांनी व्यावसायिकाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद,24 जानेवारी: भूखंडाच्या व्यवहारातून एका व्यावसायिकांच्या कार्यालयात घुसून तीन जणांनी व्यावसायिकाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबाद शहरातील विश्रांतीनगर भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली असून एक जण फरार आहे.

शेषराव शेंगुळे हे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांचे विश्रांतीनगर भागात कार्यालय आहे. शेंगुळे आणि गजानन जाधव यांच्यात भूखंड विक्रीवरून वाद सुरू होता. गुरुवारी दुपारी शेंगुळे हे त्यांच्या कार्यालयात बसले असताना गजानन जाधव त्यांची पत्नी स्वाती आणि मेहुणा पप्पू सूर्यवंशी हे कार्यालयात आले व त्यांनी शेंगुळे यांच्या अंगावर सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल टाकून त्यांना कार्यालयातच जिवंत जाळले. नंतर आरोपी तिथून पसार झाले. शेंगुळे हे आरडाओरड करीत बाहेर आले नागरिकांनी त्यांच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली. अशाच परिस्थितीत त्यांनी पोलिस स्टेशन गाठले. याप्रकरणी पुंडलीक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी गजानन जाधव व त्याची पत्नी स्वातीला अटक केली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. या हल्ल्यात शेंगुळे हे गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय आहे प्रकरण?

मिळालेली माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी शेंगुळे यांनी गजानन दत्त जाधव (रा. राजनागर मुकुंदवाडी) यांना सुंदरवाडी येथील जमीन विकली होती. साडेतीन लाख रुपयांचा जमिनीचा व्यवहार करून गजानन यांनी प्लॉट पत्नी स्वाती यांच्या नावावर केला. परंतु काही दिवसांनी प्लॉट वादग्रस्त असल्याचे जाधव यांना कळले. फसवणूक झाल्याने जाधव यांनी मुकुंदवाडी पोलिसांकडे तक्रार केली. तेव्हापासून ते वारंवार शेंगुळेला पैसे परत मागत होते. परंतु त्यांना ते मिळाले नाही. गुरुवारी शेंगुळे जयभवानी नगरमधील त्यांच्या कार्यालयात होते. काही वेळाने गजानन जाधव व स्वाती यांचा भाऊ श्रीराम मोहन सुरवसे (रा. जालना) हेदेखील गेले. पैशांची मागणी केल्यावर शेंगुळे यांनी तत्काळ एक लाख देऊन उर्वरित रक्कम नंतर देतो, असे आश्वासनही दिले. परंतु वाद वाढला व जाधव, सुरवसे यांनी शेंगुळे यांच्या अंगावर पेट्रोल फेकून काडी ओढून पेटवून दिले.

First published: January 24, 2020, 4:23 PM IST

ताज्या बातम्या