पंढरपूर, 03 एप्रिल : कोरोनाच्या फैलावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. असं असतानाही नियमांना पायी तुडवत सांगोला तालुक्यातील घेरडी इथे बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत पार पडली. या शर्यतीवेळी अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात आले. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या घोडागाडी व बैलगाड्यांची शर्यत आयोजित केल्याप्रकरणी संयोजक संतोष नामदेव खांडेकर या घेरडी तालुका सांगोला यांच्यासह अज्ञात दहा बैलगाडी चालाकांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदी असल्याने फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन केले असताना सांगोला तालुक्यातील घेरडी येथील अतीउत्साही लोकांनी शासनाच्या आदेशाचा भंग केल्याचे दिसून येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने घोडागाडी व बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली असताना या आदेशाचा भंग करत ऐन संचारबंदी काळात 31 मार्च रोजी सांगोला तालुक्यातील घेरडी येथे 5 बैल व घोडा जोडीच्या गाड्यांची शर्यत घेत साधारणतः सहा किमी पळवले होते. बैल व घोडा जोडीच्या गाड्या जोरात पळविण्यासाठी चाबकाने मारण्याचा प्रकार घडला आहे. सदर घडनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्यात शर्यीतीचे आयोजक संतोष नामदेव खांडेकरसह अज्ञात 10 चालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचा-लॉकडाउनमध्ये भांडी घासण्याचे असेही फायदे, वाचाल तर करणार नाही कंटाळा
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 'बेस्ट'मध्येही घुसला कोरोना, एक कर्मचारी निघाला पॉझिटिव्ह
दरम्यान, देशभरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. एका दिवसात 235 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत देशभरातील आकडा 2 हजारच्या वर गेला आहे. त्यातही सर्वात जास्त रुग्णांची संख्या महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा राज्यात आहे. महाराष्ट्रात 400हून अधिक कोरोनाच्या पॉझिटिव्ह केसेस आढळल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे आता कोरोना अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांच्या घरात किंवा कार्यालयात पोहोचू लागला आहे. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना असतानाही नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. त्यातलीच एक अत्यावश्यक सेवा म्हणजे बेस्ट. याच बेस्टमधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
हे वाचा-घरातून LIVE करत होती अँकर, पाठीमागून शर्ट न घालता आले बाबा... पाहा VIDEO