अलिबाग, 27 जानेवारी : अलिबागमध्ये (Alibag) पोलिसांची ( police exercise) सरावादरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस सराव करत असताना गोळी (gun fire) थेट कार्ल्यागावातील स्थानिकांच्या घरात घुसली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण कार्लेकर भयभीत झाले असून सराव बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथे पोलीस करीत असलेला गोळीबार सराव हा कार्ले ग्रामस्थांच्या जीवावर बेतत आहे. कार्ले गावातील मंगेश नाईक आणि प्रफुल्ल पाटील याच्या घरात दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान प्रत्येकी एक गोळी पडली आहे. यामध्ये कोणाला काही दुखापत झालेली नसली तरी वत्सला बाबू पाटील (72) या थोडक्यात बचावल्या आहेत.
अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथे पोलिसांचा गोळीबार सराव क्षेत्र आहे. नवी मुंबई, ठाणे येथील पोलीस हे बंदुकीतून गोळीबार करण्याचा सराव करण्यासाठी परहूर पाडा येथे येत असतात. याआधीही गोळी कार्ले गावात येण्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस, जिल्हा प्रशासन यांना अनेक निवेदन दिले आहेत. त्यानंतर गोळीबार सराव येथे 20 फुटाची भिंत ही बांधली आहे. मात्र, असे असले तरी सराव सुरू झाला की गोळ्या येण्यास सुरुवात झाली आहे.
(VIDEO : 'अनिता भाभी'वर चढला इंग्लिश गाण्याचा फिव्हर; नेहा पेंडसेचा किलर अंदाज)
आजही परहूर पाडा येथे पोलिसांचा सराव सकाळपासून सुरू होता. दुपारी साडे बारा एक वाजेच्या सुमारास दोन डोंगर पार करून गोळी ही मंगेश नाईक यांच्या पत्र्यावरून घरातील मजल्यावरील एक इंच सिमेंट शीट मधून लादीवर पडली. तर दुसरी गोळी प्रफुल्ल पाटील यांच्या पत्र्यावरून भिंतीवर आपटून अंगणात जमिनीवर पडली. यावेळी प्रफुल्ल पाटील यांच्या आई ह्या भिंतीला टेकून बसल्या होत्या सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. गावात येत असलेल्या या गोळ्या नागरिकांच्या जीवावर उठल्या असल्याने याचा बंदोबस्त त्वरित करावा आणि सराव गट पूर्ण पणे बंद करा अशी मागणी कार्ले ग्रामस्थांनी केली आहे.
(एअर इंडियाची जबाबदारी टाटा समूहाकडे, रतन टाटांचा खास संदेश)
चार वर्षापासून अशा घटना कार्ले गावात घडल्या आहेत. त्यामुळे परहूरपाडा येथे सुरू असलेला पोलिसांचा गोळीबार सराव बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. तर अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.