जळगाव, 14 डिसेंबर : लग्न झाल्यानंतर प्रत्येक नवविवाहितेची माहेरी पाठवणी होत असते. नेहमी प्रमाणे भाऊ नाहीतर वडील आपल्या मुलीला आणण्यासाठी सासरी जात असतात. पण, जळगावात एका भावाने आपल्या बहिणीला आणण्यासाठी थेट हेलिकॉप्टर (helicopter) घेऊन आल्याची सुखद घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील कावडीया कुटुंबातील शिवानीचा विवाह हा परळी वैजनाथ येथील जैन कुटुंबातील डॉ. कुणाल यांच्यासोबत झाला होता. मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला होता.
त्यानंतर लाडकी बहिण लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी येणार होती. त्यामुळे शिवानीचा भाऊ विराजने आपल्या बहिणीचे घरी जोरदार आणि जरा हटके स्वागत करण्याचे ठरवले होते. त्यामुळे विराजने आपल्या बहिणीला हेलिकॉप्टरच आणण्याचा इरादा केला होता. त्यानुसार, परळी येथं विराज हेलिकॉप्टरने पोहोचला.
आपल्याला घेण्यासाठी विराज हेलिकॉप्टर घेऊन आला याचा सुखद धक्का शिवानीला बसला. बघता बघता गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातील लोकांची एकच झुंबड उडाली.
जळगावमधील सागर पार्क मैदानावर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. शिवानीचे माहेर अशा प्रकार जंगी स्वागत झाल्यामुळे सगळेच जण भारावून गेले होते. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारांनी तिच्या स्वागतासाठी एकच गर्दी केली होती. ढोल ताशाच्या गजरात शिवानीचे जळगावात स्वागत करण्यात आले होते.
सागर पार्क मैदानाऐवजी हेलिकॉप्टर हे जळगाव विमानतळावर उतरणार होते. पण धावपट्टीवर काम काढण्यात आल्यामुळे विमान प्रशासनाकडून नकार देण्यात आला होता. त्यानंतर अनेक शासकीय परवान्या घेऊन अखेर हे हेलिकॉप्टर सागर पार्कवर हेलिपॅड तयार करून उतरवण्यात आले होते. एका भावाने आपल्या बहिणीसाठी केलेल्या पराक्रमामुळे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.