Home /News /maharashtra /

स्मशानभूमीच्या दारावर 2 तास होता मृतदेह पडून, ठाकुर्लीतील धक्कादायक प्रकार उघड

स्मशानभूमीच्या दारावर 2 तास होता मृतदेह पडून, ठाकुर्लीतील धक्कादायक प्रकार उघड

नातेवाईकांनी केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनीही आमच्याकडे चावी नसल्याचं सांगून हात झटकले

    प्रदीप भणगे, प्रतिनिधी ठाकुर्ली, 29 जानेवारी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने चोळगाव-ठाकुर्लीकरांच्या सोयीकरिता स्मशानभूमी उभारली आहे. मात्र, काही लोकांनी हटवादीपणा करून या स्मशानभूमीला टाळे ठोकल्याने तिथं अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मृतदेहाची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भागात राहणाऱ्या जिलेबीबाई शर्मा या 72 महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी झाली. घरची मंडळी, नातलग, जवळपासच्या रहिवाश्यांनी अंत्ययात्रा काढून हा मृतदेह केडीएमसीच्या ठाकुर्ली-चोळगाव तलावाजवळील स्मशानभूमी समोर आणला. मात्र, या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला ठोकलेलं टाळे पाहून अंत्ययात्रा काढणाऱ्यांनी मृतदेह तेथेच खाली ठेवला. मृतदेह जवळपास दोन तास तेथेच पडून होता. नातेवाईकांनी केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनीही आमच्याकडे चावी नसल्याचं सांगून हात झटकले. त्यामुळे नातेवाईक संतापासह चिंताही व्यक्त करताना आढळून आले. आता या मृतदेहाचे करायचे काय ? असा प्रश्न या नातेवाईकांना पडला. त्यानंतर अखेर संतप्त नातेवाईकांनी स्मशानभूमीला ठोकलेले टाळे तोडून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नातेवाईकांवर बिकट प्रसंग उभा राहिला होता. मृतदेहाची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली. चक्क सलाईनमध्ये आढळलं शेवाळ दरम्यान, बीडच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एका सलाईनच्या बाटलीत चक्क शेवाळ आढळल्याने जिल्हा आरोग्य यंत्रनेमध्ये खळबळ उडाली. जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात ही सलाईन आढळून आली आहे. एका परिचारकांच्या सतर्कतेने हा सर्व प्रकार उघड झाला. ही सलाईन एखाद्या रुग्णाच्या उपचारासाठी वापरण्यात आली असती तर याचा परिणाम काय झाला असता, असा सवाल रुग्ण करत आहेत. रुग्णाच्या उपचारासाठी लावण्यात येणाऱ्या सलाईनचे घटक नसेद्वारे पूर्ण शरीरात रक्तात मिसळले जातात. त्यामुळे ही सलाईन रुग्णासाठी वापरण्यात आली असती तर एखाद्या रुग्णाला इन्फेक्शन होऊन मृत्यू होण्याचा धोका देखील होवू शकतो. त्यामुळे आता सलाईनच्या पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई होणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. नेहमीच वेगवेगळ्या कारणास्तव जिल्हा रुग्णालय चर्चेत असतो. मात्र आता घडलेल्या प्रकाराने जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहे. मात्र या घटनेमुळे रुग्णांच्या जीवशी कोण खेळततर नाही ना हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी जिल्हा चिकित्सकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: KDMC, Thakurli

    पुढील बातम्या