ठाणे मनपाचा भयंकर गैरप्रकार; कोविड रुग्णाचा मृतदेह सोपवला भलत्याच कुटुंबाच्या हाती, अंत्यसंस्कारानंतर सत्य आलं समोर

ठाणे मनपाचा भयंकर गैरप्रकार; कोविड रुग्णाचा मृतदेह सोपवला भलत्याच कुटुंबाच्या हाती, अंत्यसंस्कारानंतर सत्य आलं समोर

ठाणे महापालिकेतून वारंवार निष्काळजीपणाच्या घटना समोर येत आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. सोनावणे कुटुंबीयाने गायकवाड्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले होते

  • Share this:

 ठाणे, 7 जुलै : मुंबई, ठाण्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या भालचंद्र गायकवाड याचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचा मृतदेह कोपरीतील सोनवणे कुटुंबीयांना देण्यात आला. मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात श्री सोनवणे जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिकेचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघड

कोविड केअर सेंटरमधून 72 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मागील दोन दिवसापासून शोध सुरु होता. या संदर्भात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. परंतू आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह कोपरीतील एका कुटुंबाकडे सोपविण्यात आला होता. त्या कुटुंबाने त्यांचा आपला नातेवाईक  समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या कुटुंबातील सदस्य तर जिवंत आहेत. परंतू आता ज्याच्यावर या कुटुंबाने अंत्यसंस्कार केले तो त्यांचा सदस्य नसून ते गायकवाड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोविड रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी रुग्ण बेपत्ता झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. दरम्यान या संदर्भात ठाणे मतदाता जागरण अभियानाच्यावतीने याला जबाबदार म्हणून पालिका प्रशासनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

मंगळवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील कोविड केअर रुग्णालयात जाऊन येथील डॉक्टरांशी चर्चा करुन 48 तासात रुग्णाचा शोध लावण्याचे आश्वासन घेतले होते. अखेर रात्री उशिरा या रुग्णाचा शोध लागला.  मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

सदर रुग्ण हा सुरुवातीला कळवा रुग्णालयात दाखल होता. त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयाने त्यांना महापालिकेच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. तशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देखील देण्यात आली. त्यानुसार त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात चौकशीसाठी देखील गेले होते. परंतु गायकवाड नावाचा व्यक्ती तेथे नसल्याचे दिसून आले. त्यानंतर मागील दोन दिवसापासून ठाणे मतदाता जागरण अभियान, भाजप यांच्या माध्यमातून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरु होते. परंतु त्यांचा काही केल्या शोध लागत नव्हता.

अखेर मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्यांचा मृतदेह कोपरीतील सोनावणे कुटुंबीयाचा सदस्य असल्याचे समजून बंद प्लास्टीकमध्ये देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. परंतू त्यांच्या कुटुंबातील सोनावणे हे जिवंत असल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. गायकवाड यांचे तीन दिवसापूर्वीच निधन झाले होते असेही त्यांनी सांगितले. यातून महापालिका प्रशासन नातेवाईकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पारदर्शक बॉडीबॅग न वापरल्यानेच हा भावनांशी खेळ असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतू हा गोंधळ कोणी घातला, कोणी त्यांचा मृतदेह कोपरीतील कुटुंबाकडे स्वाधीन केला. हे कोडे असून यात दोषी कोण हे पाहणे महत्वाचे आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 7, 2020, 10:36 PM IST

ताज्या बातम्या