पिंपरी, 04 जून : फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असल्याने ताब्यात घेतलेल्या सोलापूर महापालिकेच्या आरोपी उपमहापौराला पोलिसांनी कोरोनाच्या भीतीने सोडून दिलं होतं. मात्र, हे प्रकरण पिंपरी चिंचवड पोलिसांना चांगलंच भोवल असून या प्रकरणी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आपल्या पोलीस 2 अधिकाऱ्यांना बेजबाबदार ठरवत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यानुसार हे प्रकरण जिथे घडलं त्या सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले असून, या प्रकारणाचे तपास अधिकारी असलेले उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण ?
सोलापूर महापालिकेतील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी 2002 मध्ये पिंपळे-निलख येथील औंदूंबर सोसायटीत फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट त्याने बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना विकला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा-वादळानंतरही राज्यात पावसाचं धूमशान; या भागांमध्ये आजही इशारा
सांगवी पोलीस ठाण्यातील पथकाने 29 मे रोजी काळेला सोलापूर येथून ताब्यात घेऊन सांगवीला आणले होते. मात्र, चौकशी सुरू असताना काळेला अचानक शिंका येऊ लागल्या. बोलताना त्रास होऊ लागला, आणि अस्वस्थ वाटू लागले. ही सर्व लक्षणे कोरोना आजाराची असल्याचा पोलिसांचा समज झाला आणि त्यांनी काळे याला उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन सोडून दिलं.
मात्र, कोरोनाची लक्षण दिसतं होती तर त्यांना रुग्णालयात पोलिसांनी स्वतः दाखल का केलं नाही? यामुळे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या चौकशीमध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचं समोर आलं आणि त्यामुळे सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. तर उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.
उपचारासाठी पोलिसांच्या तावडीतून सुटल्या नंतर आरोपी काळेचा फोन बंद झाला होता. त्याला खरंच कोरोना झालाय का त्यांच्यावर उपचार सुरू आहेत का? या बद्दलही त्यांच्या पक्षातील नेत्यांनी खुलासा केला नाही. एकूणच काळे याच्या अशा वागण्यांमुळे तो फरारी असून पक्षश्रेष्ठीच त्यांना पाठीशी घालत असल्याच्या चर्चाला उधाण आलं आहे.
हेही वाचा-8 जूनपासून सुरू मॅकडोनाल्डसह 'हे' रेस्टॉरंट, जेवायला जाताना असे असतील नियम
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.