पुणे 26 जून : सर्व राज्यात गाजलेल्या मोहोम्मद कतिल सिद्दीकी खून प्रकरणाचा तब्बल सात वर्षानंतर निकाल लागलाय. या प्रकरणातले आरोपी शरद मोहोळ आणि अलोक भालेराव यांना कोर्टानं पुराव्या अभावी निर्दोष ठरवलंय. या प्रकरणी सर्वच साक्षीदार फितूर झाले होते. पुण्याच्या येरवडा कारागृहात असलेल्या सिद्दीकीची 2012 मध्ये गळा दाबून हत्या करण्यात आली होती. सिद्दीकी हा इंडियन मुजाहीद्दीनचा दहशतवादी होता. पुण्यात झालेल्या जर्मन बॉम्बस्फोट प्रकरणातला तो मुख्य आरोपी होता.
मुळचा बिहारचा असलेल्या सिद्दीकीला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. नंतर जर्मन बेकरी आणि इतर काही प्रकरणात त्याचा सहभाग असल्याने महाराष्ट्र एटीएस ने त्याला ताब्यात देण्याची मागणी केली होती. तो ताब्यात आल्यानंतर त्याला येरवडा जेलमधल्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच ठिकाणी शरद मोहोळ आणि अलोक भालेराव हे मोहोळ गँग मधले गुंडही होते.
या गुंडांचं आणि सिद्दीकीचं पटत नव्हतं. त्यांची सारखी भांडणं होत होती. याच भांडणातून शरद आणि अलोकने सिद्दीकीची गळा दाबून हत्या केली असा आरोप होता. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी काही अधिकाऱ्यांना नलंबितही केलं होतं. सिद्दीकी याने पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेट गणपती हलवाई मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.