सोलापूर, 14 ऑक्टोबर : परतीच्या पावसाने राज्यात धुमशान घातले आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्याभरात पावसाचा हाहाकार उडाला आहे. या पावसाचा फटका भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या जुन्या राजवाड्याला बसला आहे. 373 वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला आहे.
सोलापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे 373 वर्ष जुना असलेल्या भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या राजवाड्याला फटका बसला आहे. अक्कलकोट संस्थानचा दुर्बीण बुरूज ढासळला आहे. अतिवृष्टी आणि झाडा झुडपांमुळे दुर्बीण बुरुज कोसळला आहे.
#सोलापूर : भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला pic.twitter.com/tvZdDXHIFk
— News18Lokmat (@News18lokmat) October 14, 2020
अक्कलकोट संस्थान गादीची स्थापना पहिले श्रीमंत फत्तेसिंह राजे भोसले यांनी केली होती. अक्कलकोट संस्थानने 373 वर्षांपूर्वी हा राजवाडा बांधला होता. छत्रपती शाहू महाराज (संभाजी राजे यांचे पूत्र)यांनी अक्कलकोट संस्थानची 1707 साली निर्मिती केली होती.
या घटनेमुळे अक्कलकोट संस्थानच्या व्यवस्थापकांचे राजवाड्याकडे दुर्लक्ष असल्याचे उघड झाले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या राजवाड्याच्या बुरज ढासल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती आणि पूल या ठिकाणची वाहतूक वळवावी किंवा तात्पुरती थांबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
त्याचबरोबर, अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असं आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
तसंच, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 0217-2731012 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकांवर नागरिकांनी संपर्क करावा असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.