भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी
डोंबिवली, 27 मे : खरेदी म्हटलं की आपल्याला मार्केट आठवतं. तुम्ही साड्यांचे मार्केट ऐकले असेल दागिन्यांचे मार्केट असेही नाव ऐकले असेल पण तुम्ही चिंधी मार्केट हे नाव ऐकले आहे का? डोंबिवली जवळील गोळवली गावात हे चिंधी मार्केट आहे. या चिंधी मार्केटमध्ये चिंध्या विकत मिळत नाही तर येथे विकत मिळतात डिझायनर फॅब्रिक. या फॅब्रिकपासून तुम्ही साड्या, ब्लाऊज, घागरे, वन पिस, गाऊन यासारखे अनेक डिझायनर कपडे शिवून घेऊ शकता आणि विशेष म्हणजे हे शिवलेले कपडे लग्न कार्यात घालू शकता. स्वस्तात होणारी कपड्यांची ही खरेदी सर्वानाच भुरळ पाडणारी आहे.
चिंधी मार्केट का म्हणतात ?
चिंधी मार्केटमध्ये पूर्वी डोंबिवली एमआयडीसी येथून आलेले काही कट पिसेस विक्रीसाठी येत. त्यावेळी विविध रंगातील फॅब्रिक विकले जात असे. तेव्हापासून या मार्केटला चिंधी मार्केट म्हणतात. आता या मार्केटमध्ये सुरतहून फॅब्रिक मागवत असल्याचे विक्रेते सांगतात.
स्वस्त चिंधी मार्केटमध्ये येतात फॅशन डिझायनर
या मार्केटमध्ये 30 रुपये मीटर पासून 3000 हजार रुपये मीटर पर्यंतचे फॅब्रिक उपलब्ध आहेत. या मार्केटमध्ये फॅब्रिक घेण्यासाठी मोठ मोठे फॅशन डिझायनर येतात. इतकेच नव्हे तर या मार्केटमध्ये फॅब्रिक घेतल्यानंतर कपडे शिवून देखील दिले जातात.
चिंधी मार्केट हे डोंबिवलीहून कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. एका छोट्याशा गल्लीमध्ये हे मार्केट असल्याने येथे मार्केट आहे हे कोणालाच कळत नाही. मात्र त्या गल्लीत पोहचले की छोटी छोटी दुकाने दिसायला सुरुवात होते. या दुकानांचे भाडे कमी आहे. त्यामुळे आम्हाला फॅब्रिक कमी दरात विक्री करणे परवडते, अशी माहिती विक्रेते शब्दाब खान यांनी दिली.
किलोवरही मिळतात कट पिस फॅब्रिक
या मार्केटमध्ये किलोवर देखील कट पिस फॅब्रिक विकले जाते. किलो वर विकताना साधारण 150 रुपये किलोमध्ये 10 ते 12 मीटर फॅब्रिक मिळते. मात्र हे कट पिस असल्याने या मध्ये विविध रंगाचे आणि विविध प्रतीचे कापड मिळते. त्यामुळे या मार्केटची नाव चिंधी मार्केट का आहे हे लक्षात येते.
गुलाबजामचे इतके प्रकार तुम्ही पाहिले नसतील? एकदा याच या ठिकाणी VIDEO
या प्रकारचे मिळतात फॅब्रिक
जरदोसी वर्क, प्रिंटेड, फ्लॉवर प्रिंटेड ब्रोकेट,नेट, चिकन, लखनवी, सॅटीन, रॅम्बो, वेलवेट असे फॅब्रिकचे विविध प्रकार मिळतात.
वेलवेट नव्वारी साड्या मिळतात शिवून
चिंधी मार्केटमध्ये नव्वारी साड्या शिवून मिळतात. विशेषतः बाजीराव मस्तानी या सिनेमा नंतर वेलवेटच्या नव्वारी साड्यांना अधिक मागणी आहे असे इरफान सोलंकी यांनी सांगितले.
कुठे आहे मार्केट ?
चिंधी मार्केट डोंबिवली कल्याण मार्ग , गोळवली गाव , मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.