ठाणे, 31 मार्च : एखाद्याला Coronavirus ची लागण झाल्याचं लक्षात येताच त्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन केलं जातं. मुंबईतल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते आहे. हे लक्षात घेत पोलीस आणि प्रशासन जास्त रुग्णसंख्या असलेले परिसरच क्वारंटाइन करत आहेत. अशा परिसरांध्ये कडक संचारबंदी किंवा लॉकडाउनची अंमलबजावणी होते. ठाण्यात याच धर्तीवर एक अख्खं रुग्णालय क्वारंटाइन करण्यात आलं.
खासगी रुग्णालयात एक रुग्ण उपचार घेत होता. त्याची कोरोनाव्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. पण त्याच्यामुळे पहिल्या खासगी रुग्णालयात संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेत ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. पालिकेने सगळं रुग्णालयच क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयात इतर 9 रुग्ण उपचार घेत आहेत. डॉक्टर आणि इतर कर्मचारी मिळून 33 जण या रुग्णालयात काम करतात. या सर्वच्या सर्व 42 जणांना इतरांपासून वेगळे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना : मुंबई तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर? युद्धपातळीवरील उपाययोजनांचा आढावा
ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या रुग्णालयात 23 मार्चपर्यंत एक रुग्ण उपचारासाठी दाखल होता. त्याची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हे तातडीचे उपाय केले आहेत. तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आता अन्य रुग्णालयात उपचार घेत आहे.
मुंबई आणि परिसरात कोरोना व्हायरचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता हा संसर्ग कम्युनिटी लेव्हलला पसरू नये म्हणून प्रशासन दक्षता घेत आहे. ठाण्यात आतापर्यंत 12 कोरोनाग्रस्त सापडले आहेत.
31st March 2020 @ 10 am
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 230 झाली आहे. यामध्ये मुंबई व ठाणे परिसर 122, पुणे 46,नागपूर 17,अहमदनगर 05, रत्नागिरी 01, औरंगाबाद 01,यवतमाळ 03, मिरज 25, सातारा 02, सिंधुदुर्ग 01, कोल्हापूर 02, जळगाव 01,बुलढाणा 03, नाशिक 01 असा तपशील आहे. pic.twitter.com/tiQlFND1Z1
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 31, 2020
ही बातमी प्रसिद्ध होत असताना राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 230 झाली आहे. यामध्ये मुंबई व ठाणे परिसरात सर्वाधिक 122 रुग्ण आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय कडक करण्यात आले आहेत.
अन्य बातम्या
कोरोनाच्या चाचणीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
अंगावर फाटकं रेनकोट, डोक्यावर हेल्मेट; कोरोनाग्रस्तावर असे उपचार करतायेत डॉक्टर