भिवंडी, 8 नोव्हेंबर : ठाणे जिल्ह्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजीने डोके वर काढले असून भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजप प्रदेश सचिव दयानंद चोरघे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला आहे. प्रदेश सचिवाने राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
दयानंद चोरघे यांनी ठाणे जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्यासाठी मोठे प्रयत्न करून प्रत्येक गावात भाजपच्या शाखा उघडल्या आहेत. तसंच खासदार, आमदार निवडून आणण्यासाठीही मोठे योगदान दिले होते. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे अनेक कार्यकर्तेही नाराज झाले आहेत.
दयानंद चोरघे आगामी काळात कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. कारण त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होऊ होईल, असं बोललं जात आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश, अशी आहे चोरघे यांची राजकीय कारकीर्द
काँग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यावर दयानंद चोरघे यांच्यावर भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. तसंच चोरघे यांची चार महिन्यापूर्वी प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु जिल्ह्यातील खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी त्यांना निर्णय प्रक्रियेपासून बाजूला सारून काम सुरू केल्याने दयानंद चोरघे व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना होती.
या पार्श्वभूमीवर दयानंद चोरघे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. चोरघे यांनी राजीनामा वैयक्तिक कारणास्तव देत असल्याचे नमूद केले तरी सुध्दा खासदार कपिल पाटील यांच्यासोबत झालेल्या मतभेदातूनच त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. दयानंद चोरघे यांच्या राजीनामामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपामधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.