अभियंत्याला केलेली मारहाण अंगलट, जितेंद्र आव्हाडांच्या 3 अंगरक्षक पोलिसांना अटक?

अभियंत्याला केलेली मारहाण अंगलट, जितेंद्र आव्हाडांच्या 3 अंगरक्षक पोलिसांना अटक?

सहा महिने उलटल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी या मारहाण प्रकरणात सहभागी असलेल्या तिघा अंगरक्षक पोलिसांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • Share this:

ठाणे, 5 ऑक्टोबर : ठाण्यातील अनंत करमुसे या सिव्हिल इंजिनियरने आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या 15 ते 20 समर्थकांनी त्यांना जबर मारहाण केली होती. या प्रकरणी सहा महिने उलटल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी या मारहाण प्रकरणात सहभागी असलेल्या तिघा अंगरक्षक पोलिसांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी अटक केलेल्या तिघांमध्ये मुंबईतील दोन आणि ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा फोटो वापरून ठाण्यातील आनंदनगर भागात राहणारा सिव्हिल इंजिनियर अनंत करमुसे याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.

या आक्षेपार्ह पोस्टमुळे संतप्त झालेल्या 15 ते 20 आव्हाड समर्थकांनी करमुसे यास आव्हाडांच्या नाथ बंगल्यावर नेवून जबर मारहाण केली होती. या प्रकरणात आव्हाडांचे अंगरक्षक म्हणून नियुक्त असलेले पोलीस देखील सहभागी असल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत नमूद केले होते.

या घटनेला सहा महिने उलटल्यानंतर त्या तिघा अंगरक्षक पोलिसांना सोमवारी ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड समर्थकांनी ज्याला मारहाण केली होती, त्या अनंत करमुसे याने सोशल मीडियावर त्याआधीही अनेक आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या. करमुसे हा संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचा कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत तेव्हा मोठी चर्चाही झाली होती.

Published by: Akshay Shitole
First published: October 5, 2020, 11:06 PM IST

ताज्या बातम्या