ठाण्याचे महापौर राज्यभर ठरले चर्चेचा विषय, 'हे' आहे कारण

ठाण्याचे महापौर राज्यभर ठरले चर्चेचा विषय, 'हे' आहे कारण

ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के आणि ठाण्यातील शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांना लस घेण्याची भलतीच घाई होती, असं दिसत आहे.

  • Share this:

ठाणे, 26 फेब्रुवारी : ठाण्याचे महापौर सध्या चर्चेत आले आहेत. कारण केंद्र सरकार तसंच राज्य सरकारने जारी केलेल्या कोविड लस नियमानुसार सर्वांत आधी पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना कोविडची लस देण्यात यावी, असं सांगण्यात आलं आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के आणि ठाण्यातील शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांना लस घेण्याची भलतीच घाई होती, असं दिसत आहे.

अजब म्हणजे आपण फ्रंट लाईन वर्कर आहोत, कोरोना काळात आम्ही देखील रस्त्यावर उतरुन काम केलं आहे. मग आम्ही करोना लस घेतली तर काय बिघडले असं धक्कादायक वक्तव्य महापौर नरेश म्हस्के यांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिकेने ठरवलं, त्यामुळे मी लस घेतली असं देखील महापौर नरेश म्हस्के म्हणाले आहेत. मात्र पालिकेने असं काहीही ठरवलं नाही, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली आहे.

नरेश म्हस्के हे तेच महापौर आहेत ज्यांनी फ्रंटलाईन वर्कर सोबतच लोकप्रतिनिधींनाही लस द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 2 डिसेंबर रोजी केली होती. मात्र, ती पूर्ण झालेली नाही. त्यानंतर आता तर थेट नरेश म्हस्के यांनी कोविड लस घेतली. त्यामुळे राज्यात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे, तर विरोधी पक्ष भाजपला यामुळे आयतं कोलीत मिळालं आहे.

'असा महापौर आतापर्यंत झाला नाही... होणार नाही,' अशा शेलक्या शब्दात ठाणे महानगरपालिकेतील भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्यावर टीका केली आहे. कोरोनाकाळात नागरिकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौरांनी कोरोनाची लस आमदार रवींद्र फाटक यांच्यासह सर्वांआधी घेतल्यावरून डुंबरे यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सत्ता आणि पदाचा गैरवापर करत या दोघांनी स्वार्थीपणे लस तर घेतलीच उलट त्याचे फोटोसेशन करत नागरिकांमध्ये चुकीचा संदेश पोहोचवला आहे, अशी टीका मनोबर डुंबरे यांनी केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: February 26, 2021, 11:54 PM IST

ताज्या बातम्या