ठाण्यात झपाट्यानं वाढतोय कोरोना संसर्ग, पालकमंत्र्यांनी दिले कठोर निर्देश

ठाण्यात झपाट्यानं वाढतोय कोरोना संसर्ग, पालकमंत्र्यांनी दिले कठोर निर्देश

ठाणे जिल्ह्यातील 6 महानगरपालिका क्षेत्रांत बहुतांश नागरिक दाटीवाटीच्या जागेत चाळीत किंवा स्लममध्ये राहतात.

  • Share this:

ठाणे, 13 मे: कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये उपचारानंतर सलग 10 दिवस कोणतीही लक्षणे न दिसल्यास रुग्णाला चाचणी न करता डिस्चार्ज देण्यात यावा, अशा प्रकारची मार्गदर्शक सूचना तथा नियमावली केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील  6 महानगरपालिका क्षेत्रांत बहुतांश नागरिक दाटीवाटीच्या जागेत चाळीत किंवा स्लममध्ये राहतात. त्यामुळे अशा प्रकारे रुग्णांना डिस्चार्ज दिल्यास आणि दुर्दैवाने त्या व्यक्तीस संसर्ग असल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

रुग्णाची डिस्चार्जपूर्वी कोरोना टेस्ट करण्यात यावी आणि कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याशिवाय त्याला अजिबात डिस्चार्ज देऊ नये अशा सूचना आज ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

हेही वाचा.. लॉकडाऊनमुळे अनेकांची नोकरी धोक्यात असताना विद्यार्थ्याला मिळालं 41 लाखांच पॅकेज

ठाणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ठाणे शहर व जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण देखील सर्वाधिक असल्याने एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आलेल्या नव्या नियमावलीमुळे संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, ठाणे जिल्ह्यात असलेल्या 6 महानगरपालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या लक्षात घेता रुग्णाला डिस्चार्ज देतानाची नियमांमधील शिथीलता परवडणारी नाही.

हेही वाचा..मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, बहुजन विकास आघाडीच्या नेत्याचा मृत्यू

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच, कोरोनाचा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतरच त्याला डिस्चार्ज देण्यात यावा अशा सूचना ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व 6 महापालिका आयुक्तांना दिल्या. त्यामुळे यापुढेही कोरोनाग्रस्त रुग्णाची डिस्चार्जपूर्वी टेस्ट केली जाणार असून ती निगेटिव्ह आल्यानंतरच रुग्णाला सोडण्यात येणार आहे.

First published: May 13, 2020, 2:41 PM IST

ताज्या बातम्या