ठाणे, 8 डिसेंबर : बस आणि बाईकच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात एक महिला ठार झाल्याची घटना ठाण्यात घडली आहे. प्रतीक्षा परब असं अपघातात ठार झालेल्या 35 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर या दुर्घटनेत तिचा पती जखमी झाला आहे.
तीन हात नाक्यावरून हायवेने मुलुंडच्या दिशेने MH-04 HC 1319 या मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन जणांना आज संध्याकाळी 4 ते 4:30 च्या दरम्यान सी 42 या बेस्टच्या बसने उडवले. ही मोटारसायकल पुरुष चालवत होता तर पाठीमागे त्याची पत्नी बसली होती. बसचा धक्का लागताच दोघेही गाडीसह खाली पडले. पाठीमागच्या सीटवर बसलेली तरुणी ही खाली पडताच बसच्या मागचं चाक तिच्या मानेवरून गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - धक्कादायक! दत्तक मुलीने केलेल्या लग्नाच्या हट्टामुळे पित्याला गमवावा लागला जीव
मोटारसायकल चालवणारा बेशुद्ध झाल्यामुळे त्याला एका टेम्पोमध्ये हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात या जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातातील मोटार सायकल प्रमोद बाळकृष्ण सैम यांच्या नावावर आहे. नौपाडा पोलिसांनी बेस्टची बस व मोटारसायकल दोन्ही ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून बेस्ट बसच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.