• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • भिवंडी परिसरात खासगी COVID रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लूट; आकारलं जातंय लाखोंचं बिल

भिवंडी परिसरात खासगी COVID रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लूट; आकारलं जातंय लाखोंचं बिल

खासगी रुग्णालयांच्या या आर्थिक पिळवणुकीकडे महसूल, पोलीस, महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. यासंदर्भात भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडे विचारणा केली असता या संदर्भात आपण माहिती घेऊन चौकशी करून रुग्णांना न्याय मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

  • Share this:
भिवंडी, 06 मे : कोरोनासाठी ठरवून दिलेल्या शासकीय नियमांना बगल देत भिवंडीतील खासगी रुग्णालये (Private Covid Hospital in Bhiwandi) मनमर्जीने मोठ्या प्रमाणात बिल आकारत असल्याच्या घटना वेळोवेळी समोर येत आहेत. खासगी रुग्णालयांकडून होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीमुळे ऐन कोरोना संकटात (Corona Crisis) रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच बिल भरले नाही तर रुग्णालयांकडून दमदाटी अथवा पोलीस तक्रार करण्याचा दम देखील देण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर खासगी रुग्णालयांची बिले भरण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खासगी रुग्णालयांच्या या आर्थिक पिळवणुकीकडे महसूल, पोलीस,  महापालिका  प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. मागील आठवड्यात शहरातील खासगी कोविड रुग्णालय अल मोईन या रुग्णालयात रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्णाला हातात भरमसाठ शुल्क आकारण्यात आलं. यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी बिल जास्त आकारत असल्याने रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत बिल कमी करण्याची विनंती केली. मात्र, रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णालयाचे दरवाजे आतून बंद करत रुग्णांसह रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालयात कोंडून ठेवले होते. रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यावेळी काढलेली व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. मात्र, रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून संपूर्ण बिल भरून घेतल्यानंतरच नातेवाईकांची सुटका केली. ही घटना ताजी असतानाच बुधवारी राहणाळ  येथील मढवी कोविड रुग्णालयात रुग्णांची लूट होत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. हे वाचा - अहमदनगर जिल्ह्यात लसीकरणाचा फज्जा, संतप्त नागरिकांची डॉक्टरांना धक्काबुक्की वडूनवघर गावातील बाळू पाटील यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयाने तीन दिवस अतिदक्षता विभागात आणि सात दिवस जनरल वॉर्डात, असे नऊ दिवस उपचार केले. मात्र, या नऊ दिवसांसाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी 1 लाख 67 हजार रुपयांचे बिल भरले आहे. विशेष म्हणजे आकारलेल्या बिलामध्ये आयसीयू चार्जेस एका दिवसाला नऊ हजार रुपये आकारण्यात आले आहेत. तर, आयसीयूमध्ये ऑक्सिजन (O2) सुविधा पुरविली. त्याचे एका दिवसाचे पाच हजार रुपये आकारले असून आयसीयूमध्ये असलेल्या मॉनिटरचे पंचारशे रुपये प्रतिदिन आकारले आहेत. अशा प्रमाणे आयसीयू व जनरल वॉर्डचे 1 लाख 67 हजार रुपये बिल भरले असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली. मात्र, एवढी मोठी रक्कम भरूनही या बिलाव्यतिरिक्त मेडिकल बिल 33 हजार आकारले. मेडिकल बिल भरण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैसे नसल्याने रुग्णाला डिस्चार्ज देण्यास रुग्णालयाने नकार दिला आणि नातेवाईकांची तक्रार थेट नारपोली पोलिसांना केली. 1 लाख 67 हजारांचा बिल भरूनही रुग्णालये आता दमदाटी व पोलिसांची भीती घालून रुग्णाकडून बिल वसूल करीत आहेत. मात्र, शासन निर्देशाचे पालन न करता अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या रुग्णालयावर पोलीस प्रशासनासह महापालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने रुग्णांसह नातेवाईक हैराण झाले आहेत. हे वाचा - लॉकडाऊनदरम्यान पुण्यातील गणेश मंडळांचा लहानग्यांसाठी पुढाकार, एका फोनवर घरपोच देतायेत मोफत पुस्तकं यासंदर्भात भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडे विचारणा केली असता या संदर्भात आपण माहिती घेऊन चौकशी करू आणि रुग्णाला न्याय मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र अशी अनेक उदाहरणे सद्या घडत असल्याने शासनाने त्यांच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्येक रुग्णालयांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर प्रत्येक रुग्णालयात प्रत्येक वॉर्डमध्ये सीसीटीव्ही लावून रुग्णांवर काय उपचार करण्यात येतात, याचा पुरावाच मिळेल त्यासाठी शासनाने रुग्णालयात सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब निंबाळकर यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे  केली आहे.
Published by:News18 Desk
First published: