कौमार्य चाचणी केल्यास गुन्हा; प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचीही घेणार दखल - रणजित पाटील

कौमार्य चाचणी केल्यास गुन्हा; प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचीही घेणार दखल - रणजित पाटील

कौमार्य चाचणीसारख्या प्रथांविरोधात भूमिका घेणाऱ्या युवकांच्या पाठी सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली.

  • Share this:

01 मार्च : जातपंचायतीच्या माध्यमातून कौमार्य चाचणी करणे तसेच त्याची जाहीर वाच्यता करणाऱ्या व्यक्तीविरोधातही यापुढे गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्य मंत्री (शहरी) रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत केली आहे. कौमार्य चाचणीसारख्या प्रथांविरोधात भूमिका घेणाऱ्या युवकांच्या पाठी सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली.

शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी जातपंचायती आणि कौमार्य चाचणीसारख्या मुद्दयांवर लक्षवेधी सूचना मांडली. कौमार्य चाचणीमुळे महिलेच्या प्रतिष्ठेवर घाला येतो. जात पंचायतीचे पंच तसेच या प्रक्रियेत असलेल्या आणि तपासात हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली आहे. कंजारभाट समाजातील जातपंचायतींनी स्वत:ची घटना आणि नियमावली तयार केली आहे. संविधानालाच आवाहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप गोऱ्हे यांनी केला.

यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री पाटील म्हणाले की, जातपंचायत सदस्यांविरूद्ध तसेच अशा प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्यांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. अशा प्रथांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या समाजातील सुशिक्षित तरूणांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे.

जातपंचायतीच्या माध्यमातून दबाव टाकणाऱ्या किंवा सामाजिक बहिष्कार कायद्याच्या उल्लंघन करणाऱ्या घटनांबद्दल प्रसारमाध्यमात येणाऱ्या बातम्यांची दखल घेऊन पोलिसांकडून ‘स्यू-मोटो’ दखल तात्काळ गुन्हा नोंदविण्यात येईल, असेही रणजित पाटील यांनी स्पष्ट केले.

 

First published: March 1, 2018, 8:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading