'दिवाळीनंतर सुरू होणार ‘लावणी’ आणि ‘तमाशा’, फड मालकांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

'दिवाळीनंतर सुरू होणार ‘लावणी’ आणि ‘तमाशा’, फड मालकांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

'तमाशा आणि लावणी सुरू झाली तर आमच्या आयुष्यातला अंधार तरी संपेल. कलाकारांना दोन घास तरी मिळतील'

  • Share this:

मुंबई 04 नोव्हेंबर: Unlockची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सगळेच व्यवहार सुरू झाले आहेत. आता चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लोककला असलेल्या तमाशालाही परवानगी द्यावी अशी मागणी आता करण्यात येतेय. फड मालकांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. दिवाळीनंतर ‘लावणी’ आणि ‘तमाशा’ सुरू करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी फड मालकांना दिलं आहे.

गेले दहा महिने लावणी आणि तमाशा बंद आहे. त्यामुळे कलाकार आणि फड मालक आणि सगळ्यांचीच उपासमार होत आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली असं अखिल भारतीय लोकनाट्य मराठी तमाशा परिषदचे कार्याध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी सांगितलं.

तमाशा आणि लावणी सुरू झाली तर आमच्या आयुष्यातला अंधार तरी संपेल. कलाकारांना दोन घास तरी मिळतील असंही जाधव यांनी सांगितलं.

दिवाळीनंतर लावणी आणि तमाशा सुरू करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहितीही जाधव यांनी दिली. तमाशा सुरू झाला तर त्यावर पोट असलेल्या शेकडो लोकांना आर्थिक आधार मिळेल असंही ते म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांत टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यात येत आहे. 5 नोव्हेंबरपासून सिनेमा हॉल 50 टक्के आसनक्षमतेवर सुरू करण्यास राज्य सरकारने आता परवानगी दिली आहे. तसंच नाट्यगृहे देखील आता खुली होणार आहेत.

राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार योगा क्लास आणि इनडोअर स्पोर्टस गेम्स यांनाही मुभा देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्तच्या ठिकाणी हे सर्व सुरू होईल. सिनेमा हॉल सुरू होणार असले तरी तिथे फूड कोर्ट आणि फूड स्टॉक करण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. सामाजिक अंतर आणि शासनाकडून सांगण्यात आलेल्या इतर उपाययोजना करणं बंधनकारक असणार आहे.

दुसरी लाट येण्याची शक्यता, अनलॉकनंतरही घ्यावी लागेल काळजी

एकीकडे, राज्यात मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत विविध गोष्टी सुरू करण्यास पुन्हा परवानगी देण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भावही दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र असं असलं तरीही कोरोनाची दुसरी लाट पुन्हा येऊ शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे कोरोनाबाबत खबरदारी आगामी काळातही घ्यावी लागणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 4, 2020, 9:14 PM IST

ताज्या बातम्या