'अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं तिचा केलेला खूनच'

'अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं तिचा केलेला खूनच'

अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं योजनबद्धरित्या तिचा केलेला खून आहे, असा थेट आरोप वन्यजीवप्रेमींनी केलाय.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 3 नोव्हेंबर : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या जंगल परिसरात 13 लोकांचा जीव घेणाऱ्या टी-1 अर्थात अवनी या नरभक्षक वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं ठार केलं. पण, अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं योजनबद्धरित्या तिचा केलेला खून आहे, असा थेट आरोप वन्यजीवप्रेमींनी केलाय. वनविभागाने या ऑपरेशनबद्दल अजिबात पारदर्शकता ठेवली नाही, कोट्यवधी रुपये वाया गेले, असाही आरोप वन्यप्रेमींनी केलाय. तर शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच यातील उणीवा सर्वांसमोर येतील. पण या मोहिमेसंदर्भातली सर्व माहिती पुढे यावी यासाठी फारेंसिक अहवालसु्द्धा मागवावा, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केलीय. दरम्यान, अवनी तर गेली आता तिच्या दोन बछड्यांच काय होणार असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. मानव आणि वन्यजीव संघर्षातून वाघिणील जीव गमवाला लागला असल्याचं वन्यजीव प्रेमींनी म्हटलंय.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या जंगल परिसरात 13 लोकांचा जीव घेणाऱ्या टी-1 अर्थात अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमला यश आलं. शुक्रवारी रात्री शोध सुरू असताना ती शोध पथकाला दिसली. दिसताक्षणी तिला वन विभागाच्या पथकाने जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तिनं पथकाच्या दिशेनं चाल केली. दिसताच शार्प शूटर अजगर अलीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. टी-1 वाघिणीला दोन बछडे असून, त्यांचं वय 11 महिने इतकं असून, आता त्यांना शोधण्याचं आव्हान वन विभागासमोर आहे.

जगभरातून जवळपास 168 सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांनी ती जगावी यासाठी आपापल्या परिने प्रय़त्न केले. आंदोलनेही केली. पण सहा वर्षाची अवनी आता निपचीत पडली असलेल्या एका फोटो शिवाय आता काही उरलेलं नाही. वनखात्याने जारी केलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री बोरोटी गावाजवळच्या रस्त्यावर वनखात्याच्या पथकाने अवनीला ठार केलं. या पथकात वनखात्याचे तीन कर्मचारी आणि वादग्रस्त शिकारी शफाअत अली खान यांचा मुलगा असगर अली हे शिकारी आणि जिप्सीचा ड्रायव्हर असे सगळे जण होते.

न्यूज18 लोकमतशी बोलतांना नागपूर वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा म्हणाले की, ''याआधी याच भागात अवनी दिसत होती म्हणून इथे हे पथक फिरत होतं. नजरेस पडताच ती अवनी असल्याची खात्री झाल्यावर पथकातील वनकर्मचारी शेख यांनी तिला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला. पण अवनीनं वन विभागाच्या ओपन जिप्सीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असगर अली यांनी तिच्यावर 8 ते 10 मीटर अंतरावरून गोळ्या झाडल्या. यात अवनी जागीच ठार झाली. याच भागात 29 ऑगस्ट रोजी वाघाचा हल्ला झाला होता. हा हल्ला धरून इथे तीन हल्ले झाले आहेत.''

दोन बछड्यांसोबत राहणारी टी-1 या वाघिणीने राळेगाव जंगल परिसरातील 13 लोकांचा जीव घेतला असल्यामुळे वन वनखात्यासाठी ती नरभक्षक होती. मात्र, वन्यजीवप्रेमींसाठी ती अवनी होती. 'अर्थ ब्रिगेड फाऊंडेशन'च्या डॉ. सरिता सुब्रमण्यम यांनी तिचं हे नाव ठेवलं आणि ती सर्वांसाठी पृथ्वीमोलाची अवनी झाली. पण अवनीला गोळ्या घालतांना राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने घालून दिलेले साधे नियमसुद्धा पाळले गेले नसल्याचं दुःख वाघ्रप्रेमींना आहे. नियमानुसार परवानगी असतांनासु्द्धा सुर्यास्तापुर्वी किंवा सुर्यास्तानंतर कुठल्याही वन्यप्राण्यांना गोळ्या घालता येत नाहीत, मग अवनीला रात्री साडेअकरा वाजता का गोळ्या घातल्या असा प्रश्न व्याघ्र प्रेमींनी उपस्थित केलाय. अवनीच्या जाण्यामुळे आता तिच्या बछड्यांचं काय असाही प्रश्न आता उभा ठाकला असल्याचं वन्य प्रेमिंनी म्हटलंय.

व्याघ्रप्रेमी डॉ. जेरील बानाईत म्हणाले की, ''आता या प्रकरणात आम्ही संपूर्ण माहिती गोळा करणार आहोत. पण सध्या पोस्टमाँर्टम सुरु आहे आणि या प्रकरणात फाँरेसिंक अहवालही मागवावा अशी व्याघ्रप्रेमींनी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात वादग्रस्त शाहफत अली खान याचा मुलगा का सहभागी झाला हा ही प्रश्न आहे.''

न्यायालयाच्या निर्देशानुसार या वाघिणीला आधी बेशुद्ध करायला हवं होतं. मात्र तसं न करता थेट तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. असगर अली खान याने रात्री जंगलात जाताना वेटरनरी डॉक्टरांना सोबत घेऊन जाणे आवश्यक होते. मात्र तसं नं करता तो मोजक्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जंगलात शिरला. तसंच वाघिण दिसल्यावर तिला ट्रांकुलाईझ करायला हवं होतं. मात्र तसं न करता तिला थेट गोळ्या घातल्या. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने गोळ्या घातल्यानंतर अडचणीत येऊ नये म्हणून ट्रांकुलाईझचं इंजेक्शन टोचलं. त्यामुळे हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. वाघिणीचे शवविच्छेदन करताना या सर्व बाबींची तपासणी केल्यानंतरच वास्तव पुढे आणावं, अशी मागणी प्राणिमित्रांनी केलीय.

''ऑपरेशन अवनीमध्ये महाराष्ट्राच्या वनखात्याकडे अनुभवी आणि तज्ज्ञ लोकांचा ताफा नव्हता. वनखात्याने हे ऑपरेशन पूर्णपणे शफाअत अली खान यांच्याकडे सोपवलं आणि लोकांना मूर्ख बनवलं. त्यांच्या मते, वनखात्याची अकार्यक्षमता आणि भ्रष्ट कारभार यामुळे अवनीचा हकनाक बळी गेला असल्याचे प्राण्यांचे डॉक्टर आणि प्राणीमित्र डॉ. प्रयाग यांनी सांगितले.

व्याघ्रप्रेमींनी हे आक्षेप घेतले आहेत...

- वाघीणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्नही झाला नाही.

- तिच्या शरीरावरील 'डार्ट' हा मॅन्युअली लावल्यासारखा दिसतो.

- शिकार करताना कुणीही प्रशिक्षित वन्यजीव डॉक्टर सोबत नव्हता.

- वाघीणीला मारताना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांची पायमल्ली झालीय.

- वाघीणीला गोळी मारणाऱ्या असगर अलीकडे परवाना नव्हता.

- शिकारीची जबाबदारी शफाहतवर असताना त्याच्या मुलाने गोळी का मारली ?

 VIDEO : सरकारच्या चांगल्या कामात कधी खोडा घालत नाही : उद्धव ठाकरे

First published: November 3, 2018, 7:38 PM IST

ताज्या बातम्या