अनिस शेख, प्रतिनिधी देहुरोड, 06 मार्च : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर हॉटेलमध्ये घुसून तलवारीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी देहूरोड तसंच निगडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या ६ तासांत आरोपींना जेरबंद केले आहे.
हल्लेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेला प्रशांत भालेकर मित्रांसह विकास नगर किवळे इथं मिसळ खाण्यासाठी थांबला होता. त्याचवेळी संधी साधत मुख्य आरोपी रोहित ओव्हाळ, डॅनी तांदळे यांच्यासह इतर दोन साथीदार हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर या चोघांनी दोघांना हॉटेलमधून बाहेर खेचत आणलं. बाहेर आणल्यानंतर दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी एका जणाने प्रशांत भालेकरवर तलवारीने वार केले. या चौघांनीही लाथा बुक्क्यांनी मारहाण करत दोघांनाही गंभीर जखमी केलं. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर चौघांनी घटनास्थळावरून पोबारा केला.
हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलिसांनी हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये संपूर्ण घटना कैद झाल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी मदत मिळाली. त्यानंतर निगडी तसंच देहूरोड या दोन पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईमध्ये पोलिसांनी ६ तासांमध्ये ४ आरोपीन जेरबंद केले आहे.
हल्लेखोरांवर आर्म ऍक्ट आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर हे करत आहेत. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी रोहित ओव्हाळ, रोण्या फजगे आणि आदित्य कोटगीसह अन्य एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
गाडीच्या वादावरून मुलाने केली बापाची हत्या
दरम्यान, एका दुचाकीसाठी मुलाने आपल्याच जन्मदात्या बापाला काठीने बेदम मारहाण करून जीव घेतल्याची संतापजनक घटना भंडारा भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात घडली. वडिलांचा खून करून मुलगा थेट पोलीस ठाण्यात पोहचला एकच खळबळ उडाली होती.
ताराचंद टिचकुले वय 52 वर्ष असं मृत वडिलांचे नाव आहे. ताराचंद आणि त्यांचा मुलगा लोकेश ताराचंद टिचकुले (वय 21) यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होता. गुरुवारी दुपारी लोकेश टिचकुले शेतातून घरी परत आले. येताच त्याने वडील ताराचंद यांना 'माझ्या दुचाकीची चाबी दे', असं म्हटलं. मुलांचा अवतार पाहून वडिलांनी नकार देताच त्याने भांडण सुरू केले. आपलाच मुलगा आपल्याशी भांडत असल्यामुळे ताराचंद यांचा पार चढला आणि त्यांनी अंगणात पडलेल्या काठीने लोकेशला अंगणात मारहाण केली.
त्यामुळे संतप्त झालेल्या लोकेशने त्यांच्या हातातून काठी घेऊन ताराचंद यांच्या डोक्यावर प्रहार केले. क्षणात ताराचंद हे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ताराचंद हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना दोन मुलं असून लोकेश हा लहान मुलगा आहे. नेहमी तो वडिलांसोबत वाद घालत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं.
या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या ताराचंदला पाहून प्रत्येक जण हळहळत व्यक्त करत होता. तर हत्या केल्यानंतर आरोपी लोकेशने स्वत: लाखनी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर हजर झाला. आणि आपण वडिलांचा खून केला असल्याची कबुली दिला. पोलिसांनी तातडीने लोकेशला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. परंतु, अत्यंत किरकोळ कारणावरून मुलानेच बापाची हत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.