मुंबई, 5 फेब्रुवारी : 'ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात, नाहीतर शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे.
लोकपालाची नियुक्ती, प्रत्येक राज्यात लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांना राज्यातील विविध पक्षांनी पाठिंबा दिला असतानाच आता स्वाभिमानीनेही एक पत्र लिहित या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे.
'अण्णा लवकरच उपोषण सोडतील'
'अण्णांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. ते मांडत असलेल्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे अण्णा हजारे उद्या दुपारपर्यंत उपोषण मागे घेतील,' असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता.
'महाजनांकडून दिशाभूल'
'गिरीश महाजन लोकांची दिशाभूल करत आहेत. मी त्यांच्यासोबतच्या चर्चेनंतर समाधानी नाही,' असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. 'अण्णांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे,' असा गिरीश महाजन यांनी केलेला दावा अण्णांनी खोडून काढला आहे.
VIDEO : काँग्रेसमध्ये दाखल होताच शिल्पा शिंदेची मनसेवर टीका, UNCUT पत्रकार परिषद