गडचिरोली: भुसुरुंग स्फोटप्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी निलंबित

गडचिरोली: भुसुरुंग स्फोटप्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी निलंबित

कुरखेडा भुसुरुंग स्फोटप्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी (एसडीपीओ) शैलेश काळे यांच्यावर अखेर निलंबनाची करवाई करण्यात आली आहे. काळे यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

  • Share this:

गडचिरोली, 21 जून- कुरखेडा भुसुरुंग स्फोटप्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी (एसडीपीओ) शैलेश काळे यांच्यावर अखेर निलंबनाची करवाई करण्यात आली आहे. काळे यांच्यावर SOP (standard operating procedure) व निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. काळे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतील कुरखेडा भागात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भुसुरुंग स्फोटात शीघ्र कृती दलाचे (क्यूआरटी) 15 जवान शहीद झाले होते.

एसडीपीओ काळे यांच्या निष्काळजीपणामुळेच 15 जवान शहीद

भुसुरुंग स्फोटप्रकरणी काळे यांच्या कार्यशैलीवर आणि निर्णयावर आक्षेप घेतला गेला होता. शहिदांच्या नातेवाईकांनीही काळे यांच्यावर टीका केली होती. भूसुरुंग स्फोट प्रकरणात निष्काळजीपणा बाळगल्याचा आरोप असलेले कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांची बदली नंदुरबारला करण्यात आली होती. विशेष म्हणजे शहीद पोलिस जवानांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत कारवाईची मागणी केली होती. धानोराचे एसडीपीओ विक्रांत गायकवाड यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. एसडीपीओ शैलेश काळे यांच्या निष्काळजीपणामुळेच क्यूआरटीचे 15 जवान शहीद झाल्याचा गंभीर आरोप शहीद जवान राजू नारायण गायकवाड यांची पत्नी भारती गायकवाड यांनी केला होता.

या घटनेच्या आदल्या रात्री नक्षलवाद्यांनी दादापूर येथे 27 वाहनांची जाळपोळ केली. या घटनास्थळावर पोलिस पथक पोहोचत असताना मार्गातच भूसुरुंग स्फोटाची घटना घडली. जाळपोळीच्या घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून खबरदारीच्या नियमावलीचे पालन न झाल्यानेच पोलिस पथक नक्षलवाद्यांच्या सापळ्यात अडकल्याचा निष्कर्ष प्राथमिक चौकशीतून काढण्यात आला होता. सुरक्षेची कुठलीही खातरजमा न करता कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांनी पोलिस पथकाला दादापूर येथे पोहोचण्याचे आदेश दिल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांच्याबद्दल शहीद पोलिस जवानांच्या कुटुंबीयांमध्ये रोष होता. या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. पोलिस महासंचालक कार्यालयाच्या वतीने या घटनेची चौकशी करण्यात आली आहे. चौकशी अहवाल गृहमंत्रालयास सादर करण्यात आला होता. त्यावरून काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गडचिरोलीत घटनास्थळाजवळून पहिला VIDEO

First published: June 21, 2019, 12:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading