• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • भिवंडीत आढळला 'कोरोना'चा संशयित रुग्ण

भिवंडीत आढळला 'कोरोना'चा संशयित रुग्ण

सदर महिलेस कोरोना व्हायरसच्या संशयावरून पुढील उपचारासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविल्यात आले आहे.

  • Share this:
भिवंडी, 11 मार्च : जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून देशासह राज्यातही कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून आल्या नंतर बुधवारी भिवंडीत देखील कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आला होता.  मात्र, निगेटिव्ह असल्याचं आरोग्य अधिकारी डॉ.अनिल थोरात यांचे म्हणणे असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलं आहे. भिवंडीतील 60 वर्षीय महिला मागील आठवड्यात नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी पुण्यात गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती भिवंडीत आल्या नंतर त्यांना सर्दी, खोकला, आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्या स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्या होत्या. मात्र, प्रकृतीत फरक पडत नसल्याने बुधवारी त्या भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदर महिलेस कोरोना व्हायरसचा संशय वाटल्याने या महिलेस सतर्कता आणि पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठविले असल्याची माहिती इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर महिलेस कोरोना व्हायरसच्या संशयावरून पुढील उपचारासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुबईत कस्तुरबा रुग्णालयात हलविल्यात आले आहे. नागपूरमध्ये कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला दरम्यान, राज्याची आर्थिक राजधानी मुंबईनंतर आता देशाची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या नागपूरमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.  नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात या रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा रुग्ण तीन दिवसांपूर्वी अमेरिकेहून नागपुरात आला होता. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता अहवालात कोरोना व्हायरस झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे राज्यात आता कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. दरम्यान, आज संध्याकाळी महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहे. हे 10 जण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, पण ते गंभीर नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच आठवड्यात गुंडाळणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. कोरोना व्हायरसबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत लोकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. राज्यात 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. पॉझिटिव्ह रुग्णं आहेत पण ते गंभीर नाहीत. एक ग्रुप परदेशातून राज्यात आला होता. त्यातून हे 10 रुग्ण आढळले. या ग्रुपमधील व्यक्तींचा  ज्यांच्याशी संबध आला आहे. त्यांच्याही तपासणी सुरू आहे. यात दोन जण मुंबईतील आहे तर 8 जण हे पुण्यातील रुग्ण आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 'परदेशातून आलेल्यांनी 14 दिवस घरात राहावे' कोरोनाच्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे.  विमानतळांवर तपासणी सुरू आहे. जे परदेशातून आले आहे, त्यांनी घाबरून जाऊ नये. घरी आल्यानंतर निदान 14 दिवस घरातच राहावे, अशी खबरदारीची सुचनाही त्यांनी केली. 'शाळा-कॉलेज बंद करण्याचा अद्याप निर्णय नाही' शाळा कॉलेज बंद करण्यात येण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.  पण, उद्या परिस्थिती काय आहे त्यानुसार निर्णय घेतला जाईल, तशी सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 'अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपशीर करून येत्या शनिवारी किंवा रविवारी कामकाज पूर्ण करून सर्व कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी परत जातील.' असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 'आयपीएलचे सामने प्रेक्षकाविना' कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता राज्यात होत असलेल्या आयपीएलचे सामने हे प्रेक्षकांविना व्हावेत असा प्रस्ताव समोर आला आहे, याबद्दल चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. पुण्यापाठोपाठ मुंबईतही आला 'कोरोना', 2 रुग्ण पॉझिटिव्ह दरम्यान, मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba hospital) कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी  2 जणांना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं आहे. दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. दुबईहून प्रवास करून आलेले पुण्यातील 2 प्रवासी कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू आहे. या रुग्णांची मुलगी तसंच ज्या ओला टॅक्सीने या रुग्णांनी मुंबई-पुणे प्रवास केला. टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील कोरोना बाधित आढळले आणि आता या रुग्णांसोबतचे मुंबईतील 2 सहप्रवासीदेखील कोरोना बाधित असल्याचा निर्वाळा कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिला आहे.
Published by:sachin Salve
First published: