जळगाव, 6 नोव्हेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख नटी म्हणून केला होता. गुलाबराव पाटील यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युतर दिलं आहे. गुलाबराव पाटील यांचा माज संविधानिक पद्धतीने उतरवणार, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?
ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. सुषमा अंधारे यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे. मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. असा जोरदार घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच अंधारे यांच्यावर केला. तसेच सुषमा अंधारेंना मुंबई महापालिकेसाठी लाडू दिलेला आहे म्हणून त्या फिरत असल्याची टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
अंधारेंची प्रतिक्रिया
दरम्यान गुलाबराव पाटील यांच्या या वादग्रस्त टीकेवर सुषमा अंधारे यांनी प्रत्युतर दिलं आहे. 'गुलाबराव पाटील ज्या पातळीवर उतरले त्यावर मी उतरू शकत नाही. तुम्ही अश्लाघ्य आणि सवंग टिप्पणी करून माझ्या बाईपणावर हल्ला करण्याचा आणि मला नामोहरम करण्याचा जो बालीश प्रयत्न करत आहात, त्यावरून मला तुमची कीव करावीशी वाटते, तुमची भाषा तुमचा माज दाखवणारी आहे. परंतू मी बाईपणाचं कोणतंही व्हिक्टीम कार्ड खेळणार नाही. तुमचा सरंजामी माज संविधानिक पद्धतीने उतरवून दाखवेन,' असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
गुलाबराव तुमचा सरंजामी माज मी संविधानिक पद्धतीने उतरवेन... ! pic.twitter.com/SI74Rpcp5S
— SushmaTai Andhare (@andharesushama) November 6, 2022
'येणाऱ्या काळात तुमच्या पराभवाचं कोणतं कारण असेल, तर ते सुषमा अंधारे असेल,' असा पलटवार सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेवर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही सुषमा अंधारेंचा हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gulabrao patil, Shivsena, Uddhav Thackeray