विवेक कुलकर्णी, सोलापूर 8 जानेवारी : गांधी घराण्याची बदनामी करणं हाच भाजपचा अजेंडा असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना नावं ठेवणं हा भाजपचा एक कलमी कार्यक्रम असल्याचा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सोलापूरात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली.
मनमोहनसिंग यांच्यावरचा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या वेळेबद्दलही त्यांनी शंका व्यक्त केली. नेमका निवडणुका येण्याच्या आधीच हा चित्रपट कसा काय प्रदर्शीत झाला असा सवालही त्यांनी केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरातून त्यांचा भाजपचे नवखे उमेदवार शरद बनसोडे यांनी पराभव केला होता.
यावेळी सोलापूरातून पक्षाने तिकीट दिलं तर लोकसभा निवडणूक लढवायला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "गेल्या निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींनी मारलेल्या थापा सोलापूरकर विसरणार नाहीत. आता लोक त्यांना सवाल विचारणार की गेल्यावेळी दिलेल्या आश्वासन काय झालं.आता धनगर आरक्षणाबद्दल मोदी काय बोलणार ते कळेल. आता त्यांचं सरकार जाणार आणि आमचं सरकार येणार आहे."
नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेणं हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.