शरद पवारांच्या 'स्वयंसेवकां'च्या कौतुकावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

शरद पवारांच्या 'स्वयंसेवकां'च्या कौतुकावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

'या सरकारला सामान्य माणसांच्या सुख दु:खाशी काहीही देणं घेणं नाही.'

  • Share this:

पुणे 10 जून : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत असतात. मात्र लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना संघ स्वयंसेवकांचं कौतुक केलं होतं. संघाच्या स्वयंसेवकांची चिकाटी अंगी बाणवा असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यावर सोशल मीडियावरून चांगलीच चर्चा रंगली होती, शरद पवारांवर टीकाही झाली होती.

या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शरद पवार यांची स्वतःची चिकाटी काही कमी नाही. अर्थात चांगल्या गोष्टीची दाद देण्यात काहीही गैर नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाबाबत केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. या सरकारला सामान्य माणसांच्या सुख दु:खाशी काहीही देणं घेणं नाही अशी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले होते शरद पवार?

कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात पवार म्हणाले होते की, संवादात संघ स्वयंसेवकांचा हात कुणी धरू शकत नाही. ते चिकाटीने पाठपुरावा करतात. सकाळी कुणी भेटलं नाही की ते संध्याकाळी जातात पण त्यांची भेट घेतल्याशीवाय राहत नाही. कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद वाढविण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी पवारांनी हे उदाहरण दिलं होतं.

शरद पवार भाकरी फिरवणार

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर त्यातून धडा घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पक्षाच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या भाषणातून त्यांनी त्याचे स्पष्ट संकेत दिलेत. लोकांना परिवर्तन हवं आहे. त्यामुळे नव्या चेहेऱ्यांना, नव्या रक्ताला संधी दिली पाहिजे, येत्या विधानसभा निवडणुकीत हा बदल करावा लागेल असंही पवारांनी नेत्यांना स्पष्टपणे सांगितलं.

पवार आपल्या भाषणात म्हणाले, नवीन पिढीला निवडणूक प्रक्रियेत संधी दिली पाहिजे. लोकांना बदल हवा आहे. नवीन चेहेऱ्यांना संधी दिली पाहिजे. कष्टकरी तरूण चेहरांना संधी दिली पाहिजे. हा सर्व बदल करण्याची खबरदारी प्रदेशाध्यक्षांनी घ्यावी अशी सूचनाही पवारांनी केली.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नव्या तरुणांना संधी देण्याची शक्यता आहे. प्रस्थापीत आणि गेली अनेक वर्ष सत्तेचा मलिदा खाणाऱ्या नेत्यांचा लोकांना कंटाळा आलाय. त्याची जाणीव शरद पवारांना झाली आहे. या नेत्यांवर लोकांचा राग असल्याने पक्षाची दुरावस्था झाली त्यामुळे जुन्या नेत्यांना डावलून नव्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याने जुन्या नेत्यांची चिंता वाढली आहे.

First published: June 10, 2019, 3:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading