सुप्रिया सुळे vs कांचन कुल, बारामतीत चुरशीच्या लढतीत फायदा कुणाला?

सुप्रिया सुळे vs कांचन कुल, बारामतीत चुरशीच्या लढतीत फायदा कुणाला?

बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, भोर, इंदापूर या तीन विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना चांगला कौल मिळेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. पण त्याचबरोबर दौंड, खडकवासला आणि पुरंदर या विधानसभा मतदारसंघात कांचन कुल याचं पारडं जड आहे, असं म्हटलं जातं. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची बनली आहे.

  • Share this:

जितेंद्र जाधव

बारामती, 23 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे बारामती राखणार का ? त्यांचं मताधिक्य वाढणार की घटणार ? कमळाच्या चिन्हाचा कांचन कुल यांना किती फायदा होणार ? असे प्रश्न विचारले जात आहेत.

50- 50 लढत

बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, भोर, इंदापूर या तीन विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना चांगला कौल मिळेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. पण त्याचबरोबर दौंड, खडकवासला आणि पुरंदर या विधानसभा मतदारसंघात कांचन कुल याचं पारडं जड आहे, असं म्हटलं जातं. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची बनली आहे.

59 हजारांचं मताधिक्य

बारामतीची निवडणूक भाजपने जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यासाठी मावळमध्ये जास्त ताकद लावली. त्यामुळे त्यांचं बारामतीकडे दुर्लक्ष होतंय का, असाही सवाल विचारला जात होता. पण या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना एक लाखापेक्षाही जास्त मताधिक्य मिळेल, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

तेव्हा होती कपबशी

मागच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर अशी लढत होती. त्यावेळी महादेव जानकर कपबशीच्या चिन्हावर लढले होते सुप्रियाताईंना तेव्हा केवळ ६९ हजारांचं मताधिक्य होतं. आता कांचन कुल कमळाच्या चिन्हावर लढत असल्याने सुप्रियाताईंसमोर मोठं आव्हान आहे.

दौंडमध्ये कांचन कुल यांना फायदा?

कांचन कुल यांचं दौंड विधानसभा मतदारसंघात प्राबल्य आहे. त्यांचे पती राहुल कुल हे इथले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आहेत. खडकवासल्यामध्येही भाजपचे आमदार भीमराव तपकीर यांचा त्यांना पाठिंबा आहे. या मतदारसंघात बराचसा भाग शहरी आहे. इथे शहरी मतदार आणि कमळाचं चिन्ह या दोन गोष्टी त्यांच्या बाजूने जाऊ शकतात.

धनगर आरक्षणाचा मुद्दा

दौंड आणि इंदापूरमध्ये धनगर समाजाची संख्या अधिक आहे. गेल्या वेळी इथे सुप्रिया सुळेंच्या विरोधात जास्त मतदान झालं. त्या निवडणुकीत धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. पण ते आश्वासन पूर्ण न झाल्याने हे मतदार आता राष्ट्रवादीकडे वळू शकतात, अशी माहिती आहे.

पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार विजय शिवतरे हे कांचन कुल यांच्या पाठिशी आहेत,असं बोललं जातं. त्यामुळे दौंड, खडकवासला आणि पुरंदरमध्ये मतदान वाढलं तर त्याचा फायदा कांचन कुल यांना होऊ शकतो. असं असलं तरी काँग्रसचे संजय जगताप यांनी पुरंदरमध्ये सुप्रियाताईंचा जोरदार प्रचार केला आहे हे विसरून चालणार नाही.

24 गावांच्या पाण्याचा प्रश्न

बारामती हा माझा मतदारसंघ आहे, तुम्ही इथे येताना विचार करा, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत 24 गावांच्या पाण्याचा प्रश्न गाजला होता. आता मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या गावांना हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. हे सगळं पाहता बारामतीचे मतदार सुप्रियाताईंच्या बाजूने कौल देतील, अशी शक्यता आहे.

दोन नेत्यांची मदत?

खेड आणि इंदारपूरमध्ये काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे दोन्ही नेते सुप्रिया सुळेंना किती मदत करतात यावर इथला निकाल अवलंबून आहे. निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली होती पण सुप्रियाताईंना या भेटीचा किती फायदा होतो हे मात्र पाहावं लागेल.

दिग्गज नेत्यांच्या सभा

कांचन कुल यांच्या प्रचारासाठी खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये सभा घेतल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी खडकवासल्यामध्ये सभा घेतली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर बारामतीमध्ये भाड्याचं घर घेऊन दोन आठवडे मुक्काम ठोकला होता. पण या दिग्गजांच्या प्रचाराचं बूमरँग होऊन आम्हालाच जास्त मतं मिळतील, असा अजित पवार आणि सुप्रियाताईंचा दावा आहे.

(इनपुट - अद्वैत मेहता)

==============================================================================

भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी, निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण; VIDEO व्हायरल

First published: April 23, 2019, 5:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading