मी केंद्रात मंत्री होणार नाही - सुप्रिया सुळे

मी केंद्रात मंत्री होणार नाही - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''गेली साडेतीन वर्षे मी ही गोष्ट ऐकतेय, की आम्ही एनडीएत जाणार, मी मंत्री होणार, मला माहीत नाही कुठून येतात अशा बातम्या, देवालाच माहिती, आमच्याकडून तरी नाही आहे''.

  • Share this:

पंढरपूर, 28 ऑगस्ट : शरद पवारांच्या एनडीएसोबत जाण्याच्या बहुचर्चित बातमीचं अखेर सुप्रिया सुळेंनीच खंडन केलंय. आज पंढरपुरात त्यांना पत्रकारांनी याबाबत विचारलं असता त्यांनी राष्ट्रवादी एनडीएत सामिल होण्यासंबंधीचं वृत्तं पूर्णपणे खोडून काढलंय. तसंच मी केंद्रात मंत्री होणार नसल्याचंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''गेली साडेतीन वर्षे मी ही गोष्ट ऐकतेय, की आम्ही एनडीएत जाणार, मी मंत्री होणार, मला माहीत नाही कुठून येतात अशा बातम्या, देवालाच माहिती, आमच्याकडून तरी नाही आहे''.

केंद्रात मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्यापासूनच राज्यात आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आणखी एक बातमी नव्याने फिरू लागलीय आणि ती म्हणजे नितीशकुमारांप्रमाणेच आता शरद पवारही एनडीएत सामिल होणार ! त्यांना केंद्रात कृषी किंवा संरक्षण मंत्रिपद मिळणार, त्यांच्यासोबतच सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनाही केंद्रात मंत्रिपद मिळणार ! एवढंच काय राज्यातही शिवसेनेला एकाकी पाडण्यासाठी भाजप पुन्हा राष्ट्रवादीची साथ घेणार ! अशा एक ना अनेक बातम्या वजा वावड्या राजकीय वर्तुळात इकडून तिकडे फिरत होत्या.

विशेष म्हणजे या तर्कवितर्कांना पुष्टी देण्यासाठी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घनिष्ठ मैत्रीचाही दाखला दिला जात होता. तसंही शरद पवारांच्या आजवरच्या बहुतांश राजकीय चाली या 'अनप्रेडिक्टेबल'च अशाच राहिल्या असल्याने कोणीही त्या नाकारण्याची हिम्मत दाखवत नव्हतं. कारण गुजरात राज्यसभा इलेक्शनमध्ये भाजपला मतदान करण्याची प्रफुल पटेलांची खेळी नुकतीच अनेकांच्या भुवया उंचावून गेली होती. अशा या सगळ्या संशयास्पद राजकीय वावड्यांनी शरद पवारांचे बिचारे 'पुरोगामी' पाठिराखे मात्र, पुरते कोमात गेले होते. बरं तर बरं स्वतः पवारांच्या फॅमिलीतूनही याबाबत कोणीच पुढे येऊन जाहीरपणे खुलासा करत नव्हतं. पण अखेर स्वतः सुप्रिया सुळेंनीच या राजकीय वावड्यांना पुर्नविराम दिलाय.

सुप्रिया सुळेंपाठोपाठ स्वतः प्रफुल पटेलांनीही थेट ट्विटरवरून एनडीएसोबत जाण्याचं वृत्तं फेटाळून लावलंय. सुळे आणि प्रफुल पटेलांनी एनडीएसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केल्याने तूर्तासतरी अनेकांचा जीव भांड्यात पडलाय...पण पवारांच्या या 'अनप्रेडिक्टेबल' राजकीय खेळ्यांमुळे ते नेहमीच चर्चेत राहतात खरे पण याच एका कारणामुळे त्यांची राजकीय विश्वासहर्ताही कायमच संशयाच्या भोवऱ्यात राहिलीय, हेही तितकंच खरं....

First published: August 28, 2017, 8:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading