पुणे, 5 मार्च : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. दोघांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय यांच्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. लवकरच सुजय विखे पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात रात्री 8.30 वाजता मोदीबाग इथल्या पवार यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाली. या बैठकीला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सुजय विखे हेदेखील उपस्थित होते. यावेळी सुजय विखे यांना राष्ट्रवाडीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अशातच आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळत आहे. आज शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे.
सुजय विखे पाटील यांची उमेदवारी आणि नाट्यमय घडामोडी
आघाडीत अहमनगरच्या लोकसभा मतदारसंघावरून अनेकदा तिढा निर्माण झाला. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत नुकताच खुलासा केला आहे. ही जागा राष्ट्रवादीचीच असून संभ्रमावस्था निर्माण करू नका, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला दिली असल्याचं सांगितल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांनी असं कुठलंही विधान केलं नसल्याचं म्हटलं. आणि त्यानंतर आता अजित पवार यांनीही ही जागा राष्ट्रवादीचीच असल्याचं म्हटलं आहे.
VIDEO : पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याची कपडे फाटेपर्यंत धुलाई