यवतमाळ, 16 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात दाखल झाल्यावर क्वारंटाइन करण्यात येत आहे. परंतु, क्वारंटाइन करण्यात आलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मारेगाव तालुक्यातील गोंडबुराडा गावात शनिवारी सकाळी उघडकीस आली. पुण्यातून एक 23 वर्षीय तरुण आणि आपल्या दोन मित्रांसह यवतमाळमध्ये पोहोचला होता. जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाने या तरुणासह त्याच्या दोन्ही मित्रांना गावाबाहेरील एका शाळेत क्वारंटाइन राहण्यास सांगितले होते.
हेही वाचा -संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पोलिसांना सांगितलं पत्नीचा मृत्यू झाला पण खरं कारण..
या तिन्ही तरुणांना त्यांच्या कुटुंबाकडून दररोज जेवणाचे डब्बे पुरवले जात होते. पुण्यात हे तरुण आल्यामुळे या तरुणांपासून ग्रामस्थ दूरच राहत होते. त्यांच्याजवळ कुणीही फिरकत नव्हते. कोरोनाच्या भीतीमुळे या तरुणांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते. गेली तीन दिवस क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर एक तरुण जिल्हा परिषदेच्या शाळेतून पळून गेला. त्यानंतर आज सकाळी गावालगतच्या पाझर तलावाजवळ या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाने नेमकी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप, स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आहे. या तरुणाच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
8 कोरोनाबधितांनी कोरोनावर केली मात
दरम्यान, यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या 45 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 38 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7 वर आली असून ही यवतमाळकरांसाठी दिलासा दायक बातमी आहे.
हेही वाचा - बिबट्याच्या जबड्यातून तरुणाच्या सुटकेचा थरार, तुम्ही कधीच न पाहिलेला VIDEO
हे रुग्ण उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या 38 पैकी 3 जणांना संस्थात्मक विलागिकरण कक्षात ठेवण्यात येणार असून उर्वरित 35 जण गृह विलागिकरणात राहणार आहे. विशेष म्हणजे 24, 25 आणि 26 एप्रिल या दरम्यान सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली. त्यानंतर रुग्ण वाढीचा वेग कमी झाला असला तरी एक-दोन, एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा पाहता पाहता 98 वर गेला होता. यापैकी तब्बल 91 जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला यश आले. एकूणच यवतमाळ जिल्हा कोरोना मुक्तीच्या मार्गावर असून जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह गांभीर्याने परिस्थिती वर लक्ष ठेऊन ठेऊन आहे.
संपादन - सचिन साळवे