नागपूर 29 मे : काँग्रेस पक्षाची एक्सपायरी डेट संपली आहे. मात्र काँग्रेस पक्षातही काही सेवाभाव ठेवणारे नेते आहेत, अशा सेवाभावी नेत्यांना आम्ही आमच्या पक्षात घेणार असे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी नागपूरात दिलेत. औषधांची ज्याप्रमाणे एक्सपायरी डेट संपते. त्याचप्रमाणे काँग्रेसचीही एक्सपायरी डेट संपली आहे. त्यामुळे योग्य व्यक्ती योग्य पक्षात येतील तर चुकीचं माणसं चुकीच्या पक्षातच राहतील असा टोलाही त्यांनी हाणला.
चंद्रपूरातील दारूबंदी उढविण्याची मागणी नवनियुक्त खासदार बाळू धानोरकर यांनी केलीय त्यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, 'काँग्रेसच्या सदस्य पदाच्या पावतीवर मी दारू पिणार नाही अशी पाहिली अट आहे. त्यामुळे ही पावती पुस्तकं आता त्यांना फाडून फेकावी लागतील, असा टोलाही मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला.
काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार का? काय म्हणाले अशोक चव्हाण
लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आमदार पक्ष बदलतील अशी शक्यता आहे. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही शक्यता फेटाळून लावली. काँग्रेसचा कुठलाही आमदार पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षातून बाहेर जातील यात तथ्य नाही. मी अनेक आमदारांशी संपर्क केला आहे, त्यांच्याशी बोलणं झालं आहे त्यामुळे काळजीचं कारण नाही असंही ते म्हणाले. भाजप अनेक आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आमदार पक्ष सोडून जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
मनसेवर निर्णय नाही
शरद पवार आणि मनसे नेते राज ठाकरे यांच्या भेटीवर अशोक चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची मनसेबाबत जी भूमिका होती तीच भूमिका आजही कायम आहे. मंगळवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीत यावर चर्चा झाली मात्र निर्णय झाला नाही असंही त्यांनी सांगितलं.
राहुल गांधीच अध्यक्षपदी राहावेत
राहुल गांधी हेच अध्यक्षपदावर कायम राहावेत असं मतही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. तसा ठराव काँग्रेसच्या बैठकीत करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.