मुंबईकरांच्या संपर्कात आल्याची भीती...धोकादायक मार्गाने प्रवास करत 'ती' पोहोचली आदिवासींच्या गावात

मुंबईकरांच्या संपर्कात आल्याची भीती...धोकादायक मार्गाने प्रवास करत 'ती' पोहोचली आदिवासींच्या गावात

खेडच्या तहसिलदार सुचित्रा आमले यांनी डोंगर कड्यावरुन पाच किलोमीटरचा ट्रेकिंगचा धोकादायक प्रवास करत पदरवाडी गावाला भेट दिली.

  • Share this:

भिमाशंकर, 30 मे : कोरोनाच्या महामारीत शहरापासून ते गाव वस्तीवर प्रत्येक व्यक्तीला मदतीचा हात देण्यासाठी शासकीय यंत्रणांसह सामाजिक संस्थांचे मदतीचे हात पुढे आले. मात्र, यामध्ये भिमाशंकर परिसरातील पदरवाडी गाव वंचितच राहिले होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कुठलीच मदत न मिळाल्याने खेडच्या तहसिलदार सुचित्रा आमले यांनी डोंगर कड्यावरुन पाच किलोमीटरचा ट्रेकिंगचा धोकादायक प्रवास करत पदरवाडी गावाला भेट दिली. शासकीय आधिकारी आपल्या भेटीला आल्याने या आदिवासी नागरिकांनी मोठ्या आपुलकीने स्वागत करत विनातक्रार पाहुणचार केल्याने शासकीय आधिकारी भारावून गेले.

पदरवाडी हे गाव सह्याद्रीच्या कपारीत वसलेले गाव आहे. भिमाशंकरपासून पाच ते सात किलोमीटर पायी प्रवास केल्यावर सह्याद्रीच्या कपारीत फक्त 50 ते 60 लोकसंख्या असलेले आदिवासी नागरिकांचे गाव आहे. या गावाला जाण्यासाठी रस्ता, लाईट,पाणी व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही. तरी हे नागरिक आजपर्यत विनातक्रार या परिसरात वास्तव्य करत आहे.

इथे जायचं तर ना रस्ता,ना कुठल्या सुविधा... अशा परिस्थितीत जीवन जगायचं कसं? असा प्रश्न तुम्हालाही पडेल. या गावाला आजपर्यंत जायला रस्ता नाही लाईट, पाणी व शासनाच्या कुठल्याच सुविधा मिळत नाही. या गावात लॉकडाऊनच्या काळातही काहीच सुविधा मिळू न शकल्याने गुरुवारी तहसिलदार सुचित्रा आमले यांनी भेट देऊन भिमाशंकर देवस्थानच्या माध्यमातून लवकरच रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. मात्र या नागरिकांनी कुठलीच तक्रार न करता शासकिय आधिकाऱ्यांचा प्रेमाने पाहुणचार केला. यामुळे तहसिलदार सुचित्रा आमले भारवून गेल्या.

कोरोनाच्या महामारीत मुंबईकर पदरमार्गे भिमाशंकर वरुन पायी प्रवास करत खेड तालुक्यात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यावेळी पदरवाडी ग्रामस्थांच्या संपर्कात मुंबईकर आल्याची भीती होती. त्यासाठी तहसिलदार सुचित्रा आमले यांनी भिमाशंकर वरुन पाच ते सात किलोमीटर डोंगरकड्यांवरुन पायी प्रवास करुन या आदिवासी नागरिकांची विचारपूस केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच तहसिलदार आमच्या भेटीला आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

जगावर कोरोनाच्या महामारीचे संकट असताना या आदिवासी नागरिकांना कोरोनाच्या महामारीची अद्यापही कुठलीच कल्पना नाही. रोजचे दैनंदिन जीवन या नागरिकांचे सुरू आहे. शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख गेल्या चार वर्षापासून प्रयत्न करत आहेत. मात्र पदरवाडी गावची लोकवस्ती डोंगराच्या कपारीत असल्याने शासकीय सुविधा देण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र वैयक्तिक पातळीवर जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख मदतीसाठी धावून येत असल्याची भावना पदरवाडीच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली. मात्र पुढील काळात या नागरिकांच्या मदतीसाठी शासनदरबारी प्रयत्न करणार असून कोरोनाच्या महामारीनंतर भिमाशंकर देवस्थानच्या माध्यमातून पदरवाडीच्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे खेडच्या तहसिलदार आमले यांनी सांगितले.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 30, 2020, 11:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या