शरद पवारांच्या माघारीची बातमी, काय म्हणाले प्रतिस्पर्धी सुभाष देशमुख?

शरद पवारांच्या माघारीची बातमी, काय म्हणाले प्रतिस्पर्धी सुभाष देशमुख?

सहकारमंत्री आणि भाजपचे माढा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुभाष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

माढा, 11 मार्च : शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याजागी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात येऊ शकते. देशभर प्रचार करायचा असल्याने निवडणूक न लढवण्याचा आग्रह पवारांना केंद्रीय समितीने केल्याचं सांगण्यात येत आहे. यावर आता सहकारमंत्री आणि भाजपचे माढा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुभाष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवावी. ते प्रचंड मताधिक्क्यानं निवडून येतील. माझ्याकडे सोलापूर आणि माढा या मतदारसंघांची जबाबदारी आहे. मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मी निभावेल,' अशी उपरोधिक प्रतिक्रिया सुभाष देशमुखांनी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. पण या निर्णयाबाबत शरद पवार अजूनही संभ्रमात आहेत. त्यामुळेच माढा लोकसभा लढवावी की नाही, याबाबत बारामती हॉस्टेलला माढातल्या नेत्यांसोबत शरद पवार यांची बैठक घेण्यात आली.

दरम्यान, शरद पवारांनी आपली प्रतिज्ञा मोडून पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात कार्यकर्त्यांच्या 'आग्रहा'खातर उडी घेतली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणातली रंगत आणखी वाढणार असल्याचं बोललं जात होतं.

रासप अध्यक्ष महादेव जानकरांनी माढातून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं आता भाजपनं सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिपदी असणारे सुभाष देशमुख शरद पवारांसमोर चांगलं आव्हान तयार करू शकतात, अशीही चर्चा होती.

माढा लोकसभेत कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश?

करमाळा

माढा

सांगोले

माळशिरस

फलटण

माण

माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदासंघांपैकी 3 राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेकडे प्रत्येक 1 मतदारसंघ आहे. त्यामुळे माढ्याची ही जागा पवारांसाठी तुलनेनं सोपी मानली जाते. 2009 सालीही पवारांनी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती.

मागच्या दोन निवडणुकांत काय होती स्थिती?

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल सव्वा तीन लाखांच्या फरकाने विजय मिळवला होता. तेव्हाही भाजपकडून त्यांच्याविरोधात सुभाष देशमुख हे मैदनात होते.

कुणाला किती मते मिळाली?

शरद पवार - 530,596

सुभाष देशमुख - 216,137

महादेव जानकर - 98,946

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी थेट निवडणुकीच्या मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढवत होते. मोदी लाटेचं मोठं आव्हान असतानाही या निवडणुकीत मोहिते पाटलांनी 'विजय' खेचून आणला होता. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी दिलेली कडवी झुंजही दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती.

कुणाला किती मते मिळाली?

विजयसिंह मोहिते पाटील - 489,989

सदाभाऊ खोत - 464,645

प्रतापसिंह मोहिते पाटील - 25,187

VIDEO : सोलापूर की अकोला, कुठून लढणार? प्रकाश आंबडकरांनी दिलं मिश्किल उत्तर

First published: March 11, 2019, 2:21 PM IST

ताज्या बातम्या