अजित पवारांना आणखी एक धक्का देण्याच्या फडणवीस सरकार तयारीत!

अजित पवारांना आणखी एक धक्का देण्याच्या फडणवीस सरकार तयारीत!

पुणे जिल्ह्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले

  • Share this:

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

शिरूर, 28 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना धक्का देण्याची तयारी फडणवीस सरकारने केल्याचं चित्र आहे. कारण, पुणे जिल्ह्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत.

शिरूरच्या घोडगंगा कारखान्यात झालेल्या गैरकारभाराची चौकशी व्हावी यासाठी मागील 9 दिवसांपासून क्रांतीवीर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाची दखल सहकार मंत्र्यांनी घेतली आहे.

घोडगंगा साखर कारखान्यावर कामगारांच्या नावावर कर्ज उचलल्याचा आरोप संचालकांवर करण्यात आला आहे. तसंच कारखान्याची पाच एकर जमीन खासगी संस्थेला दिल्याचाही ठपका कारखान्यावर आहे.

या प्रकारामुळे सहकारी कारखाना तोट्यात आहे. मात्र, अजित पवारांचे निकटवर्तीय अध्यक्ष अशोक पवार यांच्या नातेवाईकांचा खासगी कारखाना तेजीत, असं चित्र इथं पाहायला मिळत आहे.

अशोक पवार हे घोडगंगा साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. मात्र, अशोक पवार यांचे आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या व्यंकटेश कृपा साखर कारखान्याकडे जास्त लक्ष असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.

कारखान्यातील भ्रष्टाचाराविरोधात शेतकऱ्यांचं कारखान्याबाहेर उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सहकार मंत्र्यांनी घोडगंगा साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, हे आरोप अशोक पवार यांनी फेटाळले आहेत. "आपण कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार", असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर तब्बल 181 कोटी रुपयांचं कर्ज आहे. 2018-2019 च्या अंदाजपत्रकात कारखान्याने 37 कोटी 94 लाख रुपयांची कर्जफेड केल्याचं नमूद केलं आहे. मात्र, तरीही कारखान्यावर अद्याप 150 कोटी रुपयांचं कर्ज आहे. सहकारी कारखाने बंद पाडायचे आणि खासगी कारखाने सुरू ठेवायचे असा घाट असल्याचा आरोप क्रांतीवीर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केला आहे. याला एका विद्यमान संचालकांनीही पाठिंबा देत राजीनामा दिला आहे.

एकूणच ऐन लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

================================

First published: December 28, 2018, 4:09 PM IST

ताज्या बातम्या