उद्धव ठाकरेंच्या आरोपाने फडणवीस सरकार हादरले, सहकारमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

उद्धव ठाकरेंच्या आरोपाने फडणवीस सरकार हादरले, सहकारमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

"उद्धव ठाकरे हे काही विरोधी पक्षनेते नाहीत. ते आमच्या मित्रपक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी ही बाब आमच्या निदर्शनास आणून दिली असती तर..."

  • Share this:

मुंबई, 09 जानेवारी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडच्या सभेत एका शेतकऱ्याला उभं करून कर्जमाफी मिळाली नाही, असा आरोप केला होता. त्यांच्या आरोपानंतर फडणवीस सरकारने लगेच स्पष्टीकरण दिले आहे. त्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचे पैसे नोव्हेंबर 2018 मध्येच स्टेट बँकेला शासनातर्फे देण्यात आलेले आहेत, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकदिवसाच्या मराठवाड्याच्या दुष्काळा दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, बीडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी हरिभाऊ सोळंके या शेतकऱ्याला भरसभेत उभं करून कर्जमाफीचे पैसे न मिळाल्याचा दावा केला होता. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

'बाळासाहेब हरिभाऊ सोळंके असं या शेतकर्‍याचं नाव असून, त्यांचे कर्ज खाते क्रमांक 33817369657 असे आहे. हे स्टेट बँकेतील खाते असून, त्यांनी 2014 मध्ये कर्ज घेतलं होतं. पुढे हे खाते एनपीए झालं. एनपीए खात्यांसंदर्भात काय करायचे, याचा निर्णय राज्यस्तरिय बँकर्स समितीत आधीच घेण्यात आला आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

'पूर्णपणे बुडित निघालेल्या खात्याला पुनरूज्जीवित करण्यासाठी सरकारने किती योगदान द्यायचे, याचे सूत्र त्यात ठरविण्यात आले होते. त्यानुसार, या शेतकर्‍याचे 98,687 इतक्या रूपयाचे खाते एनपीए खाते पुन्हा त्या शेतकर्‍याला बँकिंग नेटवर्कमध्ये आणण्यासाठी 58,493 रूपयांचे योगदान शासनाकडून देण्यात आले होते. त्यामुळे सदर शेतकर्‍याचे खाते पुन्हा नव्याने सुरू होऊ शकेल. शासनामार्फत ही रक्कम बँकेला जरी देण्यात आली असली तरी याच एनपीए अकाऊंटसंदर्भातील करारानुसार, शेतकर्‍याचे संपूर्ण 98,687 रूपये माफ झालेले आहे', असंही सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे.

'उद्धव ठाकरे हे काही विरोधी पक्षनेते नाहीत. ते आमच्या मित्रपक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी ही बाब आमच्या निदर्शनास आणून दिली असती, तर वरील संपूर्ण वस्तुस्थिती त्यांच्यापुढे आधीच आम्हाला मांडता आली असती', असा टोलाही देशमुखांनी लगावला.

====================

First published: January 9, 2019, 8:41 PM IST

ताज्या बातम्या